
मॅगी खाल्यानंतर एकाच कुटुंबातील पाच जणांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना ग्रेटर नोएडात घडली. मृतांमध्ये आई-वडील आणि तीन मुलांचा समावेश आहे. घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील तपास सुरू केला.
आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, ग्रेटर नोएडाच्या राबुपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. चहा आणि मॅगी खाल्ल्यानंतर कुटुंबाचा मृत्यू झाला. अन्नातून विषबाधा झाल्याने कुटुंबाचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज प्राथमिक तपासात वर्तवण्यात आला आहे. पाचही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले असून शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल.



























































