
सोसायटीच्या आवारात असलेले एखादे झाड धोकादायक झाले असल्यास ते तोडण्यासाठी यापुढे मोठी किंमत मोजावी लागणार आहे. भाईंदर महापालिकेने धोकादायक झाडे तोडण्यासाठी नवे दरपत्रकच जाहीर केले आहे. त्यानुसार धोकादायक झाड पालिका अधिकाऱ्यांना दाखवायचे असेल तर 300 रुपये व त्यानंतर तोडायचा निर्णय झाल्यास तब्बल 11 हजार रुपये द्यावे लागणार आहेत. त्यामुळे सोसायट्यांचा देखभाल खर्च वाढणार आहे.
धोकादायक झाडांची छाटणी करणे, आवश्यकतेनुसार झाडे तोडणे आणि त्यांचे पुनर्रोपण करण्याची मागणी सोसायट्यांकडून केली जाते. या पार्श्वभूमीवर स्थायी समितीचे सभापती हसमुख गहलोत यांनी प्रशासनाला पत्र देऊन झाडांची छाटणी व तोडणी करण्यासाठी स्वतंत्र नियमावली आणि कार्यपद्धती निश्चित करण्याची मागणी केली होती. त्यानुसार महापालिकेच्या उद्यान विभागाने नवे दरपत्रकच जाहीर केले आहे.
असे आहेत नवे दर
लहान झाडासाठी 2400, मध्यम आकाराच्या झाडासाठी 5400, तर मोठ्या झाडासाठी 11200 रुपये शुल्क प्रस्तावित आहे. छाटणी केलेल्या कचऱ्याच्या वाहतुकीसाठी 1000, तर छाटलेला कचरा उचलण्यासाठी 500 रुपये आकारण्यात येणार आहेत. याशिवाय नागरिकांनी एखाद्या झाडासंदर्भात तक्रार केल्यानंतर किंवा पाहणीची मागणी केल्यानंतर पालिकेकडून प्रत्यक्ष पाहणी करण्यात येईल. या पाहणीसाठी प्रति झाड 300 रुपये प्रस्तावित करण्यात आले आहे.




























































