ठाण्यात स्मार्ट शाळांचा फुगा फुटला; 93 शाळेत पाचपेक्षा कमी विद्यार्थी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जिल्हा परिषदेच्या शाळांना ‘स्मार्ट’ बनवण्यासाठी सरकारने लाखो रुपये खर्च केले. डिजिटल शिक्षण, स्मार्ट टीव्ही, सेमी इंग्रजी आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान याचाही उपयोग केला. पण त्यास यश आले नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. ठाणे जिल्ह्यातील स्मार्ट शाळांचा फुगा अखेर फुटला असून 93 शाळांमध्ये पाचपेक्षा कमी विद्यार्थी आहेत. पाच शाळांमध्ये तर प्रत्येकी फक्त एक विद्यार्थी असून सहा शाळांमध्ये केवळ दोन विद्यार्थी शिकत आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळांच्या या दुर्दशेची कबुली खुद्द राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिली आहे.

ठाणे जिल्हा परिषदेच्या 1325 प्राथमिक शाळा असून त्यामध्ये 66 हजार 408 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांसाठी 3166 शिक्षक कार्यरत आहेत. प्राथमिक शाळांमध्ये सरासरी सुमारे 50 विद्यार्थी प्रति शाळेमध्ये आहेत. मात्र ग्रामीण, दुर्गम आणि आदिवासी वाड्या-वस्त्यांमधील अनेक शाळांची अत्यंत कमी पटसंख्या आढळून आली आहे. जिल्हा परिषदेच्या ‘चला शाळेत जाऊया.’ या अभियानाचा आढावा घेण्यासाठी शिक्षण मंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत विद्यार्थ्यांच्या पटसंख्येबाबतची वस्तुस्थिती दिसून आली.

माध्यमिक स्तरावर 1 ते 5 विद्यार्थी पटसंख्या असलेल्या आणखी 25 शाळांची नोंद करण्यात आली आहे.

जिल्हा परिषदेच्या स्मार्ट शाळांवर सरकारने मोठ्या प्रमाणावर निधी खर्च केला. पण विद्यार्थ्यांची संख्या न वाढता उलट ती कमी झाल्याचे भयाण वास्तव लक्षात आले. शिक्षण विभागासमोर या पटसंख्येचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

अत्याधुनिक सुविधा देऊनही मुलांची संख्या वाढली नाही

ठाणे जिल्ह्यातील शाळांच्या पायाभूत सुविधांसाठी मोठ्या निधीच्या आराखड्यावरही भर देण्यात आला आहे. शाळांमध्ये डिजिटल शिक्षण, इंटरनेट, सुसज्ज वर्गखोल्या, स्वच्छतागृहे, सौरऊर्जा आणि पावसाच्या पाण्याचे संकल न यांसारख्या सुविधा उभारण्याचे नियोजन आहे. वर्गात डिजिटल स्क्रीन आले तरी विद्यार्थीच नसतील तर या सर्व सुविधांचा उपयोग काय, असा सवाल विचारला जात आहे.