
राज्यातल्या दुष्काळात आणखीन एक भर पडली आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये भूजल पातळी खालावली आहे. खासकरून नाशिक, नागपूर आणि अमरावतीमध्ये भूजल पातळीची परिस्थिती झपाटय़ाने बिघडत चालली आहे. अकरा वर्षांपूर्वी राज्यातल्या 2 हजार 245 निरीक्षण विहिरींची पातळी खालावली होती, तर 2026 मध्ये खालावलेल्या निरीक्षण विहिरींची संख्या तब्बल 3 हजार 321 वर पोहोचली आहे. म्हणजे भूजल पातळी खालावलेल्या निरीक्षण विहिरींची संख्या एक हजारने वाढली आहे. याचाच अर्थ राज्यातील जवळपास प्रत्येक दुसरी निरीक्षण विहीर धोक्याच्या पातळीवर आलेली आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत पीक आणि राज्यातील पाण्याच्या साठय़ाचे सादरीकरण झाले. राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन मंत्रिमंडळ बैठकीत प्रथमच भूजल पातळीची आकडेवारी सादर झाली. या सादरीकरणानंतर राज्यातल्या बहुतांश जिल्ह्यातील भूजल पातळी खालावली असल्याचे मुख्यमंत्र्यांपासून प्रशासकीय अधिकाऱयांच्या लक्षात आले. कोकणात 2015 मध्ये भूजल पातळी खालावलेल्या निरीक्षण विहिरींची संख्या 138 होती तर 2026 मध्ये खालावलेल्या निरीक्षण विहिरींची संख्या 190 झाली आहे. खालावलेल्या निरीक्षण विहिरींची संख्या 52 झाली आहे. म्हणजे कोकणातील भूजल पातळी अतिशय खालावली आहे.
निरीक्षण विहीर म्हणजे काय?
भूगर्भातील पाण्याची पातळी, पाण्याचा प्रवाह आणि पाण्याच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवण्यासाठी मुख्य विहिरीच्या बाजूला जी लहान विहीर किंवा बोअरवेल खोदली जाते, त्या विहिरीला ऑब्झर्व्हेशन वेल म्हणजेच निरीक्षण विहीर म्हणतात. मुख्य विहिरीतून पाणी उपसताना आजूबाजूच्या भूगर्भातील पाण्याच्या पातळीवर काय परिणाम होतो हे मोजण्यासाठी निरीक्षण विहिरीचा मोठा उपयोग होतो.
भूजल पातळी खालावल्याने विहिरींमधील पाण्याची परिस्थिती चिंताजनक आहे. नाशिकमध्ये भूजल पातळी झपाटय़ाने खालावत चालली आहे. पुणे, छत्रपती संभाजीनगरमध्ये भूजल पातळी चिंताजनक आहे. अमरावती व नागपूरमध्ये भूजल पातळी झपाटय़ाने खालावत चालली असल्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाने सादर केलेल्या सादरीकरणातून स्पष्ट झाले आहे.
पाण्याचे मोठे संकट
दुष्काळ, अपुरा पाऊस, पाण्याचा बेसुमार उपसा, पाण्याचे पुनर्भरण होण्याची प्रक्रियेतील खंड ही भूजल पातळी खालावल्याची प्रमुख कारणे आहे. भूजल पातळी अशीच खालावत राहिल्यास पिण्याचे पाणी व शेतीसाठी पाण्याचे मोठे संकट निर्माण होण्याची भीती तज्ञांनी व्यक्त केली आहे.































































