
आशियाई क्रीडा स्पर्धेतील निवडीत महाराष्ट्राच्या कबड्डीपटूंवर अन्याय झाल्याची खदखद अजूनही कायम असतानाच पहिल्यावहिल्या राष्ट्रकुल कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेने राज्याला दिलासा दिला आहे. अहमदाबादच्या वीर सावरकर स्टेडियमवर 23 ते 31 ऑक्टोबरदरम्यान रंगणाऱ्या या स्पर्धेसाठी हिंदुस्थानी पुरुष संघात महाराष्ट्राच्या पाच मराठी खेळाडूंना स्थान मिळाले आहे. अजित पवार, आदित्य शिंदे, शिवम पथारे यांच्यासह रेल्वेचे शुभम शिंदे आणि पंकज मोहिते हे मराठी शिलेदार आता आंतरराष्ट्रीय मैदानावर आपला दम दाखविण्यास सज्ज आहेत. मात्र महिलांच्या संघात महाराष्ट्राची एकही खेळाडू नसल्याने निवडीतील प्रादेशिक प्रतिनिधित्वाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
आशियाई स्पर्धेत हरियाणाच्या आठ खेळाडूंना पुरुष संघात स्थान मिळाले, तर महाराष्ट्राचा अस्लम इनामदार हा एकमेव प्रतिनिधी होता. त्यामुळे राज्यातील गुणवत्तेला पुरेशी संधी मिळाली का, असा सवाल उपस्थित झाला होता. आता राष्ट्रकुलमध्ये मिळालेल्या संधीचे सोने करून दाखविण्याची जबाबदारी महाराष्ट्राच्या शिलेदारांवर आहे. त्यांच्या चढाया आणि पकडी केवळ गुणांसाठी नव्हे, तर महाराष्ट्राच्या कबड्डीतील ताकदीवर शिक्कामोर्तब करण्यासाठीही महत्त्वाच्या ठरणार आहेत.
महिला संघातून महाराष्ट्र गायब
पुरुषांच्या संघात महाराष्ट्राचे पाच शिलेदार मैदान गाजविण्यास सज्ज असले तरी महिलांच्या संघातील महाराष्ट्राचे शून्य प्रतिनिधित्व आहे. या संघात महाराष्ट्र गायब आहे, मात्र याबाबत कोणीही आवाज उठवणार नाही. कारण महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटना प्रशासकीय गोंधळात अडकल्यामुळे सध्या ते शांत आहेत. त्यातच पुरुष खेळाडूंना मोठे प्रतिनिधित्व मिळाल्यामुळे कोणीही महिला खेळाडू आक्षेपही नोंदवणार नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळलेला एकही खेळाडू या स्पर्धेत नाही.
हिंदुस्थानी पुरुष कबड्डी संघ
योगेश दहिया (हरियाणा), शुभम शिंदे ( रेल्वे), नितेश कुमार (हरियाणा), दीपक संकर (तामीळनाडू), सुरजीत सिंग (हरियाणा), अजित पवार (महाराष्ट्र), परवेश मलिक (रेल्वे), पंकज मोहिते (रेल्वे), आदित्य शिंदे (महाराष्ट्र), शिवम पथारे (महाराष्ट्र), नीरज नरवाल (हरियाणा), भरत हुड्डा (सेनादल), सचिन तन्वर (राजस्थान), नवीन कुमार (सेनादल).
हिंदुस्थानी महिला कबड्डी संघ
निधी शर्मा (राजस्थान), सिमरन कंबोज (पंजाब), चंपा ठाकूर (हिमाचल प्रदेश), अनु कुमारी (उत्तर प्रदेश), रितू मिथरवाल (रेल्वे), कार्तिका रमेश (तामीळनाडू), सुमन साहू (रेल्वे), साक्षी (रेल्वे), ज्योती (चंदिगड), रिया कुमारी (बिहार), रेणुका चौधरी (राजस्थान), मुस्कान शर्मा (मध्य प्रदेश), प्रिया (उत्तर प्रदेश), सभाई गढवी (गुजरात).


























































