
कबड्डीच्या मैदानावर हिंदुस्थानचा पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानच नसेल तर राष्ट्रकुल कबड्डी अजिंक्यपदाच्या लढतीला अपेक्षित धार कशी येणार? पहिल्यावहिल्या राष्ट्रकुल कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेत पाकिस्तानच्या सहभागाबाबत शक्यता निर्माण झाली होती, हिंदुस्थानी सरकारने त्यांना खेळण्यास परवानगीही दर्शवली होती. मात्र आता पाकिस्तानी सरकारनेच हिंदुस्थानात संघ पाठवणार नसल्याची माहिती हिंदुस्थानी हौशी कबड्डी महासंघाचे तेजस्वी गेहलोत यांनी दिली आहे. या निर्णयामुळे या पहिल्यावहिल्या कबड्डी स्पर्धेचा रंग फिका पडला आहे. परिणामतः हिंदुस्थान-पाकिस्तान यांच्यातील टक्कर पाहण्याची संधी चाहत्यांना मिळणार नाही.
एकतर्फी लढतींची स्पर्धा
अहमदाबादच्या वीर सावरकर स्टेडियमवर 23 ते 27 ऑक्टोबरदरम्यान नियोजित या स्पर्धेत पुरुषांचे 14 आणि महिलांचे आठ संघ सहभागी होणार असल्याची आयोजकांची प्राथमिक माहिती आहे. इराण, चिनी तैपेई आणि थायलंड यांसारख्या बलाढय़ कबड्डी संघांना राष्ट्रकुल सदस्यत्व नसल्यामुळे त्यांचा सहभाग अपेक्षित नाही. अशा परिस्थितीत पाकिस्तानी संघाची सारेच आवर्जून वाट पाहत होते. पाकिस्तानी संघ येणार असल्याचेही हिंदुस्थानी कबड्डी महासंघाकडून वारंवार सांगितले जात होते. मात्र त्यांच्या माघारीमुळे पूर्ण स्पर्धेत हिंदुस्थानी संघाला आव्हान देणारा एकही संघ नसल्यामुळे ही स्पर्धा लुटूपुटूची लढाई होण्याचीच अधिक शक्यता आहे. स्पर्धा आंतरराष्ट्रीय असली तरी या स्पर्धेत खेळणारे संघ हे कबड्डीतल्या बालवाडीतील असल्यामुळे या स्पर्धेला फारसे महत्त्व मिळणे कठीण आहे.
राष्ट्रकुल कबड्डीत मराठीचा डंका; शुभम-पंकजसह अजित, आदित्य, शिवम यांची हिंदुस्थानी संघात निवड
हिंदुस्थानला दुहेरी सुवर्णसंधी
हिंदुस्थानी पुरुष आणि महिला संघांची आंतरराष्ट्रीय कामगिरी पाहता दुहेरी विजेतेपद निश्चित मानले जात आहे. बांगलादेश, मलेशिया, श्रीलंका, कॅनडा, इंग्लंड आणि अन्य सहभागी देशांचे संघही पदकासाठी झुंज देणार आहेत. हे सर्व संघ हिंदुस्थानच्या तुलनेत फारच कमकुवत असल्यामुळे स्पर्धेत चुरस दिसणे अवघड आहे. तीन वर्षांपूर्वी अहमदाबादच मध्येच हिंदुस्थान आणि पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये भिडले होते. आता त्याच लढतीची अपेक्षा होती, पण पाकिस्तानच्या माघारीमुळे अपेक्षाभंग झाला आहे.
यजमान हिंदुस्थानसह बांगलादेश, मलेशिया, सिंगापूर, युगांडा, कॅनडा, टांझानिया, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, स्कॉटलंड, केनिया आणि नायजेरिया सहभागी होणार आहेत. पाकिस्तानच्या माघारीमुळे ही स्पर्धा 13 देशांतच खेळविली जाईल. महिला गटात आठ संघांच्या समावेशाची शक्यता आहे.




























































