
मणिपूरच्या कामजोंग जिह्यात पुकी आणि नागा समुदायांमध्ये पुन्हा सशस्त्र संघर्ष पेटला असून दोन्ही गटांमध्ये झालेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेत चार जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हिंसाचारानंतर हल्लेखोरांनी पुकी समुदायाच्या 15 घरांना आग लावली.
शनिवारी दुपारी 2.30 वाजताच्या सुमारास चस्साद गावात दोन गटांमध्ये संघर्ष पेटला. त्यातून दोन्ही गटांतील लोकांनी एकमेकांवर गोळीबार सुरू केला. या हल्ल्यामागे ‘नॅशनल सोशलिस्ट काऊंसिल ऑफ नागालँड इसाक मुईवा’ आणि म्यानमारमधील तांगुखल दहशतवादी असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
तिघांवर गोळीबार
कामजोंग जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी दुसरी घटना घडली. या ठिकाणी तंगखुल नागा समुदायाच्या तिघांवर गोळीबार झाला. त्यांना कामजोंग येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रपृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. पुकी हल्लेखोरांना चस्साद येथे तैनात असलेल्या आसाम रायफल्सच्या जवानांनी मदत केल्याचा आरोप करण्यात आला आहे.




























































