
सरकारी सेवेची जबाबदारी समर्थपणे सांभाळायची आणि त्याचवेळी जागतिक क्रीडा क्षेत्रात देशाचा तिरंगा उंचवायचा, ही किमया हिंदुस्थानच्या महसूल सेवेतील (आयआरएस) अधिकारी एकता बिष्णेईने करून दाखवली आहे. अमेरिकेत झालेल्या जागतिक मास्टर्स क्लासिक पॉवरलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धेत एकताने तब्बल तीन सुवर्णपदकांची कमाई करत हिंदुस्थानच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. एकूण 362.5 किलो वजन उचलत तिने जपान आणि कॅनडाच्या बलाढय़ प्रतिस्पर्ध्यांवर मात केली.
प्रशिक्षकाचा व्हिसा नाकारला; तरीही माघार नाही!
स्पर्धेच्या तोंडावर हिंदुस्थानी संघाचे प्रशिक्षक सुनील कुमार यांचा अमेरिकेचा व्हिसा नाकारण्यात आला. त्यामुळे प्रत्यक्ष मार्गदर्शनात अडथळा निर्माण झाला, मात्र या संकटापुढे एकताने हार मानली नाही. प्रशिक्षक सुनील कुमार यांच्याशी व्हिडीओ कॉलद्वारे संपर्क साधत तिने मार्गदर्शन घेतले, तर संघाचे अधिकारी बिनू इब्राहिम यांनी प्रत्यक्ष ठिकाणी तिला सहकार्य केले. प्रशिक्षक सुनील कुमार यांनी एकताच्या विजयामागील शास्त्रशुद्ध रणनीती उलगडली. स्क्वॅट प्रकार संपेपर्यंत एकताने प्रतिस्पर्धी खेळाडूवर 20 किलोची निर्णायक आघाडी मिळवली होती. बेंच प्रेस प्रकारातही तिने ही आघाडी कायम राखली.




























































