
बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्या कारवर गोळीबार करणाऱया तिन्ही हल्लेखोरांना आज राजस्थानातील कोटा रेल्वे स्थानाकात अटक करण्यात आली. त्यांना मुंबई पोलिसांकडे सोपवले जाणार असून त्यांच्या चौकशीनंतर सर्व गोष्टींचा खुलासा होणार आहे. मात्र, टायगरवरील गोळीबारामुळे बॉलिवूडमध्ये प्रचंड दहशत पसरली असून कायदा-सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरेलल्या राज्यातील व केंद्रातील भाजप सरकारवर टीकेची झोड उठली आहे.
टायगरवर गोळीबारानंतर तिन्ही हल्लेखोर मुंबईबाहेर पळाले होते. मुंबई गुन्हे शाखेच्या 20 पथकांनी त्यांचा माग काढत दिल्ली, गुजरात व राजस्थान पोलिसांच्या सहकार्याने कोटा रेल्वे स्थानकात पकडले. फुलसिंग नरेश (18), रेहान रहशुद्दीन (18) आणि ऋतिक मेहतो उर्फ रोशन (22) अशी त्यांची नावे आहेत. फुलसिंग आणि रेहान हे दोघे हरयाणाचे तर ऋतिक हा बिहारचा आहे. पुढील तपास खंडणी विरोधी पथक करणार असल्याचे उपायुक्त राजतिलक रोशन यांनी सांगितले.
बॉलिवूडला सुरक्षेची चिंता
टायगरवरील हल्ल्यानंतर बॉलिवूडमधील सेलिब्रिटींना सुरक्षेची चिंता सतावू लागली आहे. अभिनेता विद्युत जामवाल याने मुंबईतील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पुन्हा अशी घटना घडल्यास पोलीस त्यासाठी जबाबदार असतील, असे तो म्हणाला. अभिनेते दीपक पराशर यांनीही या घटनेवर संताप व्यक्त केला. ‘आम्ही कलाकार मुंबईमध्ये टार्गेट होण्यासाठी आलो आहे का,’ असा सवाल त्यांनी केला.
कलाकारांच्या सुरक्षेचा आढावा घेणार – फडणवीस
या भ्याड हल्लेखोरांचे मास्टरमाईंड जगाच्या पाठीवर कुठेही लपले असले तरी त्यांना शोधून काढले जाईल. ज्या ज्या सेलिब्रिटींना सुरक्षेची गरज आहे त्याचा आढावा घेऊन आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात येतील असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
बिष्णोईची आजपर्यंत चौकशी का नाही? – सपकाळ
अहमदाबादच्या जेलमधून बिष्णोई गँग चालवतो. मुंबईत सातत्याने हल्ले करणाऱया गँगस्टर बिष्णोईची आजपर्यंत चौकशी का नाही? असा सवाल कॉँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.






























































