
मुंबईतील गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांना 15 लाख रुपयांत घर मिळण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे. पात्र गिरणी कामगारांसाठी मुंबई महानगर प्रदेशातील किमान 100 तयार घरे उपलब्ध असलेल्या प्रकल्पांमधून घरे घेण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यासाठी म्हाडामार्फत इच्छुकता प्रस्ताव प्रसिद्ध केले जाणार आहेत. संबंधित विकासकांनी प्रति घर 15 लाख रुपये किंवा त्या ठिकाणचा रेडीरेकनर दर यापैकी जो कमी असेल त्या दराने घरे देण्याची तयारी दर्शविणे आवश्यक राहणार आहे.
1982 च्या संपामुळे मुंबईतील 58 आजारी आणि बंद पडलेल्या कापड गिरण्यांमधील पात्र कामगार व त्यांच्या वारसांना मुंबई महानगर प्रदेशात घरे उपलब्ध करून देण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे. मात्र पात्र कामगारांना घरे मिळण्यासाठी विविध संघटनांकडून सातत्याने पाठपुरावा सुरू होता. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने 15 मार्च 2024 रोजीच्या शासन निर्णयात अंशतः सुधारणा केली आहे. खासगी विकासकांना गिरणी कामगारांसाठी घरे उभारणे अधिक सुलभ व्हावे, यासाठी मंजूर अभिन्यासावर घरबांधणीसाठी आवश्यक असलेली 30 एकर जमिनीची अट कमी करून किमान एक एकर करण्यात आली आहे. संबंधित जमीन विकासकाच्या मालकीची असावी किंवा त्या जमिनीसाठी त्याच्याकडे अहस्तांतरणीय कुलमुखत्यारपत्र असावे, अशी अट घालण्यात आली आहे.





























































