
बसस्थानकांमध्ये गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या अंगावरील दागिने चोरी करणाऱया श्रीरामपूरमधील तीन महिलांच्या टोळीला आळेफाटा पोलिसांनी पाठलाग करून अटक केली आहे. त्यांच्या साथीदारालाही अटक करण्यात आली आहे. आळेफाटा पोलीस ठाण्याच्या हद्दीत आठ गुन्हे केल्याची कबुली त्यांनी दिली आहे.
नंदा संजय सकट (वय 35), परिघा नाना राखपसरे (वय 60), शोभा प्रताप खंदारे (वय 55), संजय भानुदास सकट (वय 46, सर्व रा. इंदिरानगर, ता. श्रीरामपूर, जि. नगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
आळेफाटा बसस्थानक परिसरात 18 एप्रिल रोजी बसमध्ये चढत असताना प्रवासी महिलेच्या पर्समध्ये असलेले 50 हजार रुपये रोख रक्कम व 14 तोळे 6 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा एकूण 7 लाख 50 हजार रुपयांचा ऐवज चोरटय़ांनी लंपास केला होता. पोलीस पथकाने बसस्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता, एका कारमधील तीन महिला व एका पुरुषाच्या हालचाली संशयास्पद दिसून आल्या. पथकाने श्रीरामपूर येथे वेशांतर करून 18 एप्रिल ते 19 मे असे तब्बल एक महिनाभर इंडिका कारची सर्व माहिती मिळवली. तांत्रिक विश्लेषण करून आरोपी राहात असलेल्या रस्त्यावर बारीक लक्ष ठेवले.
दरम्यान, 19 मे रोजी गणेश चतुर्थी असल्याने हे आरोपी जालना जिह्यातील राजूर येथील गणपती मंदिर परिसरात चोरी करण्यासाठी जात असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांना मिळाली. आरोपी कारमध्ये श्रीरामपूर येथून निघाले असता, साध्या वेशात असलेले पोलीस हवालदार विनोद गायकवाड, पोलीस हवालदार अमित माळुंजे यांनी कारचा पाठलाग केला. त्यांच्या मदतीला आळेफाटा येथून पथक रवाना झाले. कारचा 125 किलोमीटर पाठलाग करत संभाजीनगरमधील वाळुंज येथे ताब्यात घेण्यात आले.
सलबतपूर, नगरमधील सराफांनाही अटक
आरोपींना आळेफाटा पोलीस ठाण्यात आणून त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी आळेफाटा बसस्थानक परिसरात केलेल्या सहा चोऱ्या, एक घरफोडी, एक जबरी चोरी असे आठ गुन्हे केल्याची कबुली दिली. आरोपींकडून 24 तोळे सोने, 15 तोळे चांदी, एक कार असा 17 लाख 58 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यांच्याकडील चोरीचे सोने विकत घेणाऱया विकास सुरेश कपिले (वय 34, रा. सलबतपूर, ता. नेवासा, जि. नगर), जगदीश गजानन देवळालीकर (वय 40, रा. रामचंद्रखुंट, नगर) या सराफांना अटक केली आहे.



























































