चौथ्या मजल्यावरून पडूनही चिमुकला सुखरूप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

सकाळी उठल्यानंतर दीड वर्षाचा अथर्व बडकडे घरातल्या हॉलमध्ये एकटाच खेळत होता. घरात अन्य कामात सर्व व्यग्र होते. त्यावेळी खेळता खेळता अथर्व हॉलच्या खिडकीजवळ आला. दुर्दैवाने खिडकीला लोखंडी ग्रील नव्हती. त्यामुळे व्हायचे तेच झाले. खेळण्याच्या नादात अथर्व त्या खिडकीतून चौथ्या मजल्यावरून खाली पडला. काळाने त्याच्यावर झडप घालण्याचा प्रयत्न केला, पण त्यातून तो निसटला आणि इतक्या उंचावरून पडूनसुद्धा अथर्व सुखरूप बचावला. त्याला केवळ किरकोळ जखम झाली.

गोवंडीतील जयगोपीकृष्ण इमारतीच्या चौथ्या मजल्यावर अथर्व त्याच्या कुटुंबीयांसोबत राहतो. खेळकर असलेल्या अथर्वची घरात मस्ती सुरूच असते. आज सकाळीसुद्धा घरात अथर्वची तशीच मस्ती सुरू होती. तर त्याची आई, वडील, आजी-आजोबा, काका सर्व घरातले काम आटोपण्यात व्यस्त होते. या सर्वांची नजर चुकवून हॉलमध्ये खेळणारा अथर्व खिडकीच्या दिशेने गेला आणि तेथील गॅलरीतून तो खाली पडला. सकाळी आठच्या सुमारास हा दुर्दैवी प्रकार घडला. अथर्व खाली पडल्याचे कळताच बडकडे कुटुंबाचा काळजाचा ठोकाच चुकला. सर्वांनी इमारतीखाली धाव घेतली. पण सर्व खाली आले तेव्हा अथर्वला पाहून सर्व चकितच झाले. कारण अथर्वला काहीच झालेले नव्हते. तो अगदी ठिकठाक होता. त्याला केवळ किरकोळ खरचटले होते. चौथ्या मजल्यावरून पडूनही अथर्वला सहीसलामत पाहून बडकडे कुटुंबीय आश्चर्यचकीत झाले.

अशोकाचे झाड ठरले संकटमोचक
जयगोपीकृष्ण इमारतीला लागूनच दुसऱया मजल्यापर्यंत एक अशोकाचे झाड आहे. हे झाड बडकडे कुटुंब राहते त्या खिडकीच्या खालीच आहे. अथर्व खिडकीतून खाली पडल्यानंतर त्या झाडात अडकला आणि फांद्यांवरून सरकत अगदी सहीसलामत खाली येऊन पडला. त्यामुळे अथर्वला फार दुखापत झाली नाही. अथर्ववर आज दुर्दैवी वेळ ओढवली होती, पण अशोकाचे झाड त्याच्यासाठी संकटमोचक ठरले.