विहिरीत पडलेल्या बिबट्याची वन विभागाकडून सुखरुप सुटका

आंबेगाव येथे मध्यरात्रीच्या सुमारास विहिरीत पडलेल्या बिबट्याची वन विभागाने रेस्क्यू सदस्यांच्या मदतीने सुखरुप सुटका केली आहे. आंबेगाव येथील तांबडेमळा परिसरात राहणारे मारुती मल्हारी तांबडे यांच्या मालकीच्या विहिरीतून बिबट्याची सुटका करण्यात आली.

तांबडेमळा येथे मराठी शाळेजवळ मारुती मल्हारी तांबडे यांचे घर आहे. घरच्या जवळच वीस फूट अंतरावर तांबडे यांच्या मालकीची विहिर आहे. बुधवारी रात्री दीड वाजता विहिरीतून ओरडण्याचा आवाज तांबडे यांचा मुलगा बाळासाहेबने ऐकला. त्यांना वाटले की विहिरीत कुत्रा पडला असावा. सकाळी विहिरीत डोकावून पाहिले असता बिबट्या पडलेला दिसला.

भानुदास तांबडे यांनी मंचर पोलीस ठाणे आणि वनविभाग यांना माहिती दिली. वनरक्षक आर. आर. मोमीन, ऋषीकेश कोकणे, महादू तांबडे, सागर भोर, रेस्क्यू सदस्य मनोज तळेकर, मिलिंद टेमकर, माऊली भोर आणि परिसरातील युवकांनी बिबट्याला बाहेर काढण्यास मदत केली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी विहिरीत पिंजरा सोडून रेस्क्यू सदस्यांच्या मदतीने बिबट्याला सुखरूप बाहेर काढून ताब्यात घेतले आहे.