कराडमध्ये घुशीच्या पिंजऱ्यात उदमांजर सापडले; नैसर्गिक अधिवासात मुक्तता

कराडमध्ये घुशीसाठी लावलेल्या पिंजऱ्यात उदमांजर (इंडियन स्मॉल सिव्हेट) सापडल्याची घटना घडली आहे. येथील गुलाबराव रामचंद्र पाटील (रा.वारुंजी फाटा ता.कराड) यांच्या घरी घुशीसाठी लावलेल्या पिंजऱ्यात इंडियन स्मॉल सिव्हेट (उद मांजर) अडकले होते. त्यांनी ते पाहताच लगेच वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांना फोन करून याबाबतची माहिती दिली.

घटनास्सथळी वनक्षेत्रपाल तुषार नवले व वनरक्षक रमेश जाधवर यांनी धाव घेतली. त्यांनी घटनास्थळी पंचनामा करून ते इंडियन स्मॉल सिव्हेट (उदमांजर) ताब्यात घेतले आहे. त्यानंतर लगेच कराड पशुसंवर्धन दवाखान्यात पशुसंवर्धन अधिकारी डॉ. राहुल दडस यांच्याकडे त्याची तपासणी करण्यात आली आहे.

सापडलेला इंडियन स्मॉल सिव्हेट (उदमांजर) हा नर आहे. तो सुस्थितीत आहे. त्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात अडचण नाही, असे डॉक्टरांनी सांगितल्यानंतर वनक्षेत्रपाल तुषार नवले, वन्यजीव रक्षक रोहन भाटे, वनरक्षक रमेश जाधवर, उत्तम पांढरे, चालक योगेश बेडेकर, वनमजुर भाऊसो नलवडे यांच्या उपस्थितीत त्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सुरक्षित सोडण्यात आले.

स्मॉल इंडियन सिव्हेट ही दक्षिण आशियातील सिव्हेटची एक प्रजाती आहे. त्याच्या शरीरावर खरखरीत तपकिरी राखाडी ते फिकट पिवळसर तपकिरी फर असतात. त्याच्या मागील बाजूस अनेक काळ्या किंवा तपकिरी पट्ट्या आहेत. कानाच्या मागून खांद्यापर्यंत दोन गडद पट्टे असतात. त्याचा फर शरीराच्या वरच्या भागावर अनेकदा राखाडी आणि खालच्या बाजूस तपकिरी असतो. डोके राखाडी किंवा तपकिरी राखाडी असते. हनुवटी अनेकदा तपकिरी असते. कान लहान आणि गोलाकार आहेत. ज्यात प्रत्येक कानाच्या मागे एक अंधुक चिन्ह आहे. आणि प्रत्येक डोळ्यासमोर एक पाय तपकिरी किंवा काळे असतात. त्याच्या शेपटीत आलटून पालटून काळ्या आणि पांढर्‍या रिंग असतात.

हा निशाचर प्राणी आहे. त्यांची घरे जमिनीत, खडकाखाली किंवा घनदाट झाडीत असते. ते स्वतःचे घुशीसारखे जमिनीखाली भुयार तयार करतात. उपनगरीय वस्त्यांमध्ये ते गटर किंवा इतर पोकळ गडद जागा तात्पुरते घर म्हणून वापरतात. लहान सिव्हेट्स हे मांसाहारी (कीटकभक्षी) प्राणी आहेत. ते प्रामुख्याने उंदीर, पक्षी, साप आणि कॅरियन यांना खातात. फळे आणि मुळे देखील खाऊ शकतात. त्यांचा प्रजनन हंगाम वर्षभर असतो. मादी सामान्यतः 2-5 पिल्लांना जन्म देते.

लहान सिव्हेटसाठी मुख्य धोका शिकारीचा आहे. हे प्राणी वेगवेगळ्या कारणांसाठी वापरले जातात. लहान सिव्हेट्सची कातडी आणि ग्रंथी स्रावासाठी शिकार केली जाते. ज्याला “सिव्हेट” कस्तुरी म्हणतात. हा घटक परफ्यूम, औषध आणि इतर उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरला जातो. ते शहरी आणि आंतरराष्ट्रीय वन्यजीव व्यापारात विकले जातात.