शहरांतही पर्यावरणपूरक घरे हवीत! दुबईतील जागतिक हवामान परिषदेत आदित्य ठाकरे यांचा सहभाग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तापमानवाढीला आळा घालण्यासाठी जीवनमानाचा दर्जा न घसरवता पर्यावरणपूरक घरे ही काळाची गरज बनली आहेत. त्या दृष्टीने आवश्यक ती पावले जागतिक आणि स्थानिक पातळीवर उचलली गेली पाहिजेत तसेच आता शहरांनीही जागतिक तापमानवाढीला हातभार लावणाऱ्या घरांकडून पर्यावरणपूरक घरांच्या दिशेने प्रवास सुरू करणे आवश्यक आहे. त्यासाठी पर्यावरणपूरक लवचिक असे धोरण राबवणे आवश्यक असल्याचे मत शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दुबई येथे सुरू असलेल्या जागतिक हवामान बदल परिषदेत आज मांडले. यावेळी त्यांनी पर्यावरणमंत्री असताना राज्यात सुरू केलेल्या कामांची माहितीही दिली.

संयुक्त राष्ट्रांच्या वार्षिक हवामान बदल परिषदेच्या वतीने (सीओपी28) दुबईत सुरू असलेल्या चर्चासत्रासाठी आदित्य ठाकरे यांना विशेष निमंत्रित करण्यात आले होते. परिषदेतील ‘रुफ ओव्हर वन हेड’ (रुह) या सत्रात जागतिक आणि स्थानिक कळीच्या मुद्दय़ांवर झालेल्या चर्चेवेळी ते बोलत होते. शहरी भागांतही पर्यावरणपूरक घरांची बांधणी आवश्यक असून यासंदर्भात शीला पटेल यांचे योगदान काwतुकास्पद आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.  जागतिक परिषदेला बोलावल्याबद्दल त्यानीं आभार मानले.

मुंबईत पहिल्यांदा इलेक्ट्रिक बस धावल्या

शहरांमधील वाहतूक, त्यामुळे होणारे प्रदूषण सुधारण्यासाठी जुन्या पद्धतीच्या वाहतूक यंत्रणेत बदल करणे आवश्यक आहे. जागतिक तापमान कृती समिती (यूएनएफसीसीसी)ने पायाभूत सुविधांबाबत बदल सुचवले आहेत. महाराष्ट्राचा पर्यावरणमंत्री असताना इलेक्ट्रिक वाहनांबद्दल धोरण तयार करून ते राबवण्यात आले. या धोरणामुळे मुंबईत पहिल्यांदाच इलेक्ट्रिक बस धावल्या. त्याचा कित्ता देशभरात गिरवण्यात आला. मुंबईतील बस डेपोत सौर ऊर्जा निर्माण करून त्यावर डबल डेकर बसही धावाव्यात असे मला वाटते, असे आदित्य ठाकरे म्हणाले.