ट्वीट करण्यापेक्षा लढायची ताकद नाही असं सांगा! आदित्य ठाकरे यांची सत्ताधाऱ्यांवर टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील जनता आणि शिवसैनिकांशी प्रत्यक्ष संवाद साधण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी सुरू केलेल्या ‘शिवसंवाद यात्रे’चा सातवा टप्पा सोमवार, 6 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. या सातव्या टप्प्यात शिवसंवाद यात्रा नाशिक, जालना, संभाजीनगर, बीड या जिह्यांमध्ये जाणार आहे. तत्पूर्वी माध्यमांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना एक आव्हान दिले होते. त्यात त्यांनी मुख्यमंत्र्यांना राजीनामा देऊन वरळी मतदारसंघातून त्यांच्या विरोधात लढण्यास सांगितले होते. त्यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, वरळीतून निवडणूक लढवण्याचं आव्हान दिल्यानंतर काल वरपासून खालपर्यंत हललेत. सोशल मीडियावर एवढी ट्वीट करण्यापेक्षा लढायची ताकद नाही, इतकं सांगितलं असतं तरी चाललं असतं. पण, अजून दावोसवर उत्तर आलेलं नाही, वेदांता फॉक्सकॉनवर उत्तर आलेलं नाही. हे असंच चाललं आहे, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

75 हजार नोकऱ्यांच्या जाहिरातीवर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, मी या बाबत सविस्तर माहिती घेऊन बोलीन. पण, महाराष्ट्र शासनाच्या जाहिराती किती निघाल्या, किती घोषणा झाल्या. त्यापैकी अर्ध्यातरी घोषणा पूर्ण झाल्यात का, हा विचार करण्याची गरज आहे, असंही ते यावेळी म्हणाले.