
‘हे जे गद्दारी करून गेले आहेत ते सर्व अपात्रच ठरणार आहेत. कायद्यात कुठेही त्यांना वाचवण्याची सोय नाही!, असा टोला शिवसेना नेते, युवासेना प्रमुख व आमदार आदित्य ठाकरे यांनी मिंधे गटाला लगावला आहे. संभाजीनगर येथे शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित क्रिकेट चषकाचे आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना आदित्य ठाकरे यांनी मिंधे गटाला हा टोला लगावला आहे
”जे गेलेयत ते अपात्र ठरणारच आहेत. कायद्यात कुठेही त्यांना वाचवण्याची सोय नाही. ही जी गद्दारी आहे त्यातून ते अपात्र ठरणारच आहेत. आज नाही तर उद्या हे होणारच न्याय नक्कीच मिळणार. जस जशा निवडणूका येतील तुम्हाला कळणार आहे की या गद्दारांना व्हीआरएस घ्यायला लावलेली आहे. बाकी काही नाही. त्यांना पुढच्या निवडणूकीत कुठच्याही सीट मिळणार नाहीत”, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे.
यावेळी त्यांनी दावोस येथे राज्य सरकारने केलेल्या करारांवरूनही त्यांच्यावर निशाणा साधला आहे. ”दावोस येथे ज्या कंपन्यांसोबत करार झाल्या त्या तीन कंपन्या राज्यातल्याच असल्याचे समोर आलेलं आहे. तुम्ही त्यांचं कॅपिटल काय आहे ते बघा. हे सर्व विस्ताराने मी काढणार आहे. नक्की बैठका कोणासोबत झाल्या. किती झालाय? बाकीचा जो तामझाम होता सोबत तो किती होता. याच्याबाबत माझ्याकडे थोडा अभ्यास जमा झाला आहे. त्याची माहिती घेईन. त्यावर लवकरच पत्रकार परिषद घेईन”, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले आहे.
शिंदे गटाकडून हिंदू जनजागृती मोहीम मोर्चा काढण्यात येणार आहे. त्याबात बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले. ”सरकार कुणाचं आहे. कोणत्या मुद्द्यावर ते बनलेलं आहे. मग हे असे मोर्चे वगैरे काढणं गरजेचं आहे का? खरा प्रश्न तिथे कश्मीरी पंडितांचा आहे. जम्मूमध्ये कश्मीरी पंडित आंदोलन करत आहेत. संजय राऊत नुकतेच त्यांना भेटून आले आहेत. त्यांच्या जीवाला धोका आहे. त्यांच्यावर हल्ले होत आहेत. त्यांच्यावर गोळीबार होत आहेत. ते बदलीची मागणी करत आहेत. अजूनही त्यांचं केंद्र सरकार ऐकत नाही ही आपल्या देशातील दुर्दैवी घटना आहे.” अशा शब्दात त्यांनी केंद्र सरकारवरही ताशेरे ओढले.

































































