आजरेकरांनी अनुभवला ‘बर्निंग कार’चा थरार, सुदैवाने जीवितहानी टळली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आजरा शहरापासून पाच-सहा किलोमीटर अंतरावरील मसोली व वेळवट्टी गावादरम्यानच्या आंबोली मार्गालगत असलेल्या वसाहतीनजीक एका धावत्या कारने पेट घेतला. सुदैवाने आतील सर्वजण प्रसंगावधान राखत कारबाहेर पडले. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.

कॅन्सरवरील औषध आणण्यासाठी जालन्याचे रामप्रसाद नरहरी कावळे यांच्यासह चौघे ‘एक्सयूव्ही-500’ या कारमधून सावंतवाडीला गेले होते. सावंतवाडीवरून परतत असताना आज पहाटे चारच्या सुमारास ही कार आजरा शहराजवळील वेळवट्टीनजीकचे धोकादायक वळण पार करून पुढे मसोलीकडे येत होती. त्याच वेळी गाडीच्या इंजिनातून धूर येऊ लागल्याने रामप्रसाद नरहरी कावळे यांच्यासह इतर तीन सहप्रवाशांनी कार त्वरित थांबविली. त्यानंतर लगेचच इंजिनमधून आगीचे लोळ येऊ लागले.

परिणामी, कारमधील सर्वांनीच बाहेर धाव घेत माती टाकून कार विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात यश आले नाही. काही वेळातच कार जळून खाक झाली. विशेष म्हणजे, कारशेजारी असलेला एक मोठा वृक्षही यात जळून खाक झाला होता. याबाबत कावळे यांनी दिलेल्या वर्दीनुसार आजरा पोलिसांत घटनेची नोंद करण्यात आली आहे.