आंदोलनात सहभागी न झाल्याने रिक्षा फोडली, चिथावणीखोर वक्तव्याप्रकरणी आठजणांविरूद्ध गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आंदोलनात सहभागी न होता, रिक्षातून प्रवाशी वाहतूक केल्याच्या रागातून अज्ञातांनी आंबेगाव बुद्रूक परिसरात रिक्षा फोडून नुकसान केले. ही घटना 12 डिसेंबरला दुपारी बाराच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी चिथावणीखोर वक्तव्याला प्रेरित होउन रिक्षाची तोडफोड करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. त्यानुसार संबंधितांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केशव नाना क्षीरसागर, संजीव कवडे, आनंद अंकुश, तुषार पवार, बाबा सय्यद यांच्यासह इतर चारजणांविरूद्ध भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उदय चंद्रकांत शिर्के (वय 46, रा. कसबा पेठ ) यांनी तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकी कॅबच्या निषेधार्थ पुण्यात 12 डिसेंबरला काही संघटनांकडून आंदोलन करण्यात आले. त्यासाठी आरोपींनी कोणी आंदोलनात सहभागी झाले नाही, तर रिक्षा फोडा, जाळून टाका असे चिथावणीखोर वक्तव्य केले होते. दरम्यान, आंदोलनात सहभागी न होता, उदय शिर्के यांनी रिक्षातून प्रवाशांची वाहतूक करीत होते. त्यावेळी अज्ञातांनी आंबेगाव परिसरात उदय यांना अडवून रिक्षाची तोडफोड केली. दमदाटी करीत त्यांच्याकडील 500 रूपये हिसकावून नेले. त्यामुळे रिक्षातील प्रवाशी घाबरून सैरभैर पळून गेले. याप्रकरणी तोडफोड करणार्‍या आरोपींचा शोध घेतला जात असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे यांनी दिली आहे.