आंबेगाव तालुक्यात ऊस तोडणी दरम्यान बिबट्याची पिल्ले आढळणे आता नित्याचे झाले असताना, आता विविध प्राण्यांची पिल्ले देखील आढळू लागली आहेत.
आंबेगाव येथील बाबासाहेब खालकर यांच्या उसाच्या क्षेत्रातील ऊस तोडणी चालू असताना ऊस तोडणी कामगारांना बिबट्या सदृश पिल्ले आढळून आली. ही माहिती तात्काळ वनपाल प्रदीप कासारे यांना कळविले असता रेस्क्यू टीमचे सदस्य दत्तात्रय राजगुरव वन कर्मचारी शरद जाधव, संपत भोर, टेमगीरे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली, व ऊस तोडणी कामगारांशी चर्चा केली. तोडणी कामगारांनी काढलेले फोटो पाहिले असता ती पिले साधारण दिड ते दोन महिने वयाची अगदी दुर्मिळ होत असणाऱ्या वाघाटी ( Rusty spotted cat ) रानमांजर या अगदी दुर्मिळ होत चाललेल्या जंगली मांजराची असल्याचे लक्षात आले. पिल्ले शेजारच्या ऊसात पळाली होती. ही वाघाटी रानमांजर शेतातील उंदीर , घुशी, साप , विंचू या सारख्या मनुष्याला त्रासदायक प्राण्यांवर गुजराण करून नियंत्रण ठेवते ह्या वाघाटी रानमांजराची उपयुक्तता दत्तात्रय राजगुरव यांनी पटवून दिली.




























































