अवतीभवती – वन्यजीवांचा संघर्ष

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अभय मिरजकर

सध्या ‘मानव आणि वन्यजीव संघर्ष’ ही एक जागतिक समस्या बनली आहे. वाढती लोकसंख्या, शहरीकरण आणि नैसर्गिक संसाधनांचा अतिवापर यामुळे मनुष्य व प्राणी यांच्यातील संघर्ष वाढत चालला आहे. विशेषत महाराष्ट्र आणि भारतातील इतर काही राज्यांमध्ये वाघ व बिबटय़ांचा मानवी वस्तीत होणारा वावर चिंतेचा विषय ठरत आहे.

रस्ते, महामार्ग, धरणे आणि खाणकाम यांसारख्या विकासकामांसाठी जंगले तोडली जात आहेत. यामुळे प्राण्यांचे नैसर्गिक अधिवास नष्ट होत असून त्यांचे भ्रमणमार्ग खंडित होत आहेत. जंगलातील तृणभक्षी प्राण्यांची संख्या कमी झाल्यामुळे वाघ आणि बिबटय़ांसारखे शिकारी प्राणी अन्नाच्या शोधात मानवी वस्तीकडे वळत आहेत. उन्हाळ्यात जंगलातील पाण्याचे स्रोत आटल्यामुळे वन्यप्राणी पिण्याच्या पाण्यासाठी गावांकडे किंवा शेतांकडे येतात. जंगलाला लागून असलेल्या जमिनीवर शेती केल्यामुळे प्राण्यांना वस्ती करणे सोपे जाते, विशेषत उसाच्या शेतात बिबटय़ा आपली पिल्ले सुरक्षितपणे वाढवतो. पण काही वर्षांत वाघ आणि बिबटय़ांच्या मृत्यूच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. द्रुतगती मार्ग आणि रेल्वे रूळ ओलांडताना, शेतात पिकांचे संरक्षण करण्यासाठी शिकारी किंवा शेतकऱयांनी लावलेल्या विद्युत तारांचा धक्का लागून वाघ आणि बिबटय़ांचा मृत्यू होत आहे. पाळीव प्राण्यांच्या शिकारीचा बदला म्हणून काही वेळा ग्रामस्थांकडून वन्यप्राण्यांना विष दिले जाते. तसेच अवयवांच्या तस्करीसाठी शिकारी प्राण्यांना लक्ष्य करतात. जंगलाजवळील शेतांमध्ये उघडय़ा विहिरी असल्यामुळे त्यात पडून बिबटय़ांचे मृत्यू होण्याचे प्रमाण मोठे आहे.

यासाठीच प्राण्यांचे भ्रमणमार्ग सुरक्षित करणे गरजेचे ठरते. महामार्गांवर ‘अंडरपास’ किंवा ‘ओव्हरपास’ बांधणे, शेताभोवती विद्युत तारांऐवजी सौर ऊर्जेवर चालणारी कुंपणे लावणे, जंगलातच पाणी कृत्रिम पाणवठे तयार करणे, वन्यप्राणी मानवी वस्तीत आल्यावर काय करावे, याचे प्रशिक्षण ग्रामस्थांना देणे, तसेच ‘प्राथमिक प्रतिसाद पथक तयार करून स्थानिकांचा सहभाग वाढवणे, ड्रोन, कॅमेरा ट्रप आणि रेडिओ कॉलरच्या सहाय्याने प्राण्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून संभाव्य संघर्ष टाळणे यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

वाघ आणि बिबटय़ा हे केवळ जंगलाची शान नसून ते निसर्गपाचे महत्त्वाचे दुवे आहेत हे स्वीकारणे गरजेचे आहे.