नांदेड-नागपूर महामार्गावर टँकरची दुचाकीला धडक, एक ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । अर्धापूर

नांदेड-नागपूर महामार्गावरील पिंपळगाव (म.) पाटी नजीक भरधाव वेगातील टँकरने मोटारसायकलला जबर धडक दिल्याने एक जण जागीच ठार झाला तर एक जण जखमी झाला आहे. ही घटना 23 नोव्हेंबर रोजी सायंकाळी घडली.

भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याकडून नांदेडकडे जाणाऱ्या मोटारसायकलला ( क्र- एम. एच. 26 बी.के. 2224) भरधाव वेगातील डिझेल टँकर (क्र- एम.एच.04 सी.ए.5736) ने जबर धडक दिल्याने मोटारसायकलवर पाठीमागे असणारे दत्तात्रय देविदास जमगे (60) हे जागीच ठार झाले. टँकर त्यांच्या पूर्ण शरीरावरुन गेल्यामुळे त्यांच्या शरीराचा अक्षरशा चेंदामेंदा झाला. चालक विठ्ठल मारोती अंबाटे (42) हे किरकोळ जखमी झाले. दोघेही रा.गुंडेवाडी ता. लोहा येथील रहिवासी आहेत. सदरील टँकर धडक देऊन त्या ठिकाणाहून फरार झाला. त्याचा प्रत्यक्षदर्शीने पाठलाग करून पकडण्याचा प्रयत्न केला. पण टँकर हाती लागले नाही. त्याचा क्रमांक मिळविण्यात मात्र ते यशस्वी झाले.

यावेळी तातडीने वसमत फाटा येथील महामार्ग पोलीस व अर्धापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाली. पिंपळगाव पाटी नजीक नेहमीच अपघात होत आहेत. गेल्या अनेक दिवसापासून या मार्गावर गतिरोधक करण्याची मागणी आहे. पण प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्या जात असल्याचा आरोप करत परिसरातील ग्रामस्थांनी प्रेत उचलू न देण्याचा पवित्रा घेतला. व तसेच थोडा काळ रस्ता अडवला. यामुळे बराच वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती. काही काळानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करून वाहतूक सुरळीत करून दिली.