
खेड-आंबवली मार्गावरील कुडोशी येथील स्पीड ब्रेकर वर मोटार सायकल आदळून झालेल्या अपघातात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षिकेचा दुर्दैवी मृत्यू झाला. सुषमा निकम (55) असे या दुर्दैवी शिक्षिकेचे नाव आहे. हा अपघात आज सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडला.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, मोहाने जिल्हा परिषद शाळेवरील शिक्षिका सुषमा निकम या शाळा सुटल्यानंतर एका दुचाकीच्या मागे बसून आपल्या भरणे बाईतवाडी येथील घरी परतत होत्या. त्यांची दुचाकी कुडोशी येथे गतिरोधकावर आदळल्याने मागे बसलेल्या निकम या उंच उडून रस्त्यावर आदळल्या. या अपघातात त्यांच्या डोक्याला जबर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची खबर मिळताच खेड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. निकम यादव यांच्या मृतदेहाचा पंचनामा करून त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवून दिला.
रविवारी सायंकाळी याच मार्गावरील देवघर येथे हळदी कुंकू कार्यक्रमासाठी गेलेल्या महिला परतत असताना त्यांच्या एपे रिक्षाला अपघात होऊन नऊ महिला जखमी झाल्या होत्या. आज पुन्हा त्याच मार्गावर कुडोशी येथे अपघात होऊन एका शिक्षिकेचा मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे





























































