जमिनीच्या वादातून मारहाण, न्यायालयाच्या आदेशानुसार नऊजणांविरुध्द गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

औसा तालुक्यातील हासेगाव येथील जमिनीच्या वादातून फिर्यादीसह परिवारातील सदस्यांना रस्त्यात अडवून रवि बापटले यांच्यासह इतरांनी कत्ती, रॉड, काठी, दगडाने जबर मारहाण करून गंभीर दुखापत केली. फिर्यादीच्या गाडीवर डिझेल टाकून जाळण्याचा प्रयत्न करीत हातातील सोन्याचे ब्रासलेट हिसकावून घेतले. या प्रकरणी औसा न्यायालयाने 156 (3) प्रमाणे पोलिसांना निर्देशित केल्याने 10 फेब्रुवारी 2023 शुक्रवारी रात्री औसा पोलीस ठाण्यात रवी बापटले व अन्य 8 जणांविरुध्द जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यासह दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत वेताळेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव वेताळेश्वर बावगे यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, आपल्या पत्नीच्या नावे 2016 मध्ये शेषेराव राठोड यांच्याकडून  5 एकर जमीन खरेदी केली. याच गटात रवी बापटले यांच्या नावेही 5 एकर जमीन आहे पण बापटले हे लोकांच्या जमिनी प्लॉट बळकावतो. याच कारणावरून 2016 पासून बापटले हा बावगे यांना त्रास देत होता. सदरचे प्रकरण न्यायप्रविष्ठ असून शासकीय अधिकार्‍याने खुणा करून दिल्यानंतरही तो वाद निर्माण करत होता. दिनांक 15 मे 2021 रोजी हासेगाव येथील राजीव गांधी पॉलिटेक्निक कॉलेज समोर बावगे यांची सफारी गाडी घेऊन चालक उभा होता. त्यावेळी रवी बापटले व अन्य 8 जण रुग्णवाहिका घेऊन सेवालयाकडे जात होते. मागील जमिनीच्या वादाचा राग मनात धरून तो गाडी का लावलीस असे म्हणत सुरुवातीला फिर्यादीचे चालक संतोष माने यास व नंतर भीमाशंकर बावगे यांची पत्नी जयदेवी बावगे, मुलगा नंदकिशोर बावगे यांना गैरकायदेशीर मंडळी जमवून कत्ती, रॉड, काठी, दगडाने मनगट, तळहात, बोटावर जबर मारहाण करून गंभीर दुखापत केली. यासह डिझेल टाकून गाडी पेटवून देण्याचा प्रयत्न केला. हातातील ब्रासलेट हिसकावून घेतले.

या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार औसा पोलिसात रवी काशिनाथ बापटले, अर्जुन मुरली पवार, प्रकाश गुलाब आडे, जगदीश उत्तम रणदिवे, अनिकेत प्रभाकर अडगळे, समाधान रामदास खंदारे सर्व रा. हासेगाव व मनोजकुमार सुभाषराव मोटे सर्व रा. मजगेनगर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास पोलीस निरीक्षक शंकर पटवारी हे करित आहेत.