आकडे टाकून वीज वापर करणाऱ्या 171 जणांवर कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आटपाडी उपविभागातील गावांमध्ये वीजचोरांविरुद्ध दोन दिवसीय धडक मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत शेतीपंपासाठी वीजवाहिन्यांवर आकडे टाकून वीजवापर करणाऱ्या 171 जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली.

आटपाडी उपविभागास शेतीला कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याच्या तक्रारी व रोहित्र जळण्याच्या प्रमाणात वाढ झाली होती. त्यामुळे या उपविभागातील आटपाडी, माडगुळे, दिघंची, राजेवाडी, नेलकरंजी, खरसुंडी, करगणी, हिवतड या गावांमध्ये महावितरणकडून धडक मोहीम राबविण्यात आली. धडक मोहिमेंतर्गत 171 शेतीपंप आकडेधारकांवर कारवाई करून वीजचोरीसाठी वापरण्यात आलेल्या केबल, पेटी व इतर साहित्य जप्त केले. कडेगाव उपविभागातील वांगी येथे सिंगल फेज वीजपुरवठा थ्री फेज करून विजेचा वापर करणाऱ्या 44 शेतीपंप ग्राहकांची पॅनेल जप्त करण्यात आली आहेत.