
नगर जिल्ह्यामध्ये बायोडिझेलबाबत पोलिसांनी धडक मोहीम सुरू केली आहे. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने सोमवारी नगर तालुक्यातील वाटेफळ येथे छापा टाकला. त्यात सुमारे 1 कोटी 75 लाख रुपयांचे बायोडिझेल जप्त करून सोळा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अकरा आरोपींना यामध्ये ताब्यात घेतले आहे. या कारवाईत तीन टँकर, 2 ट्रक, 3 चारचाकी गाड्या जप्त करण्यात आल्या आहे. या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगर ते सोलापूर रोडवर वाटेफळ शिवारातील हॉटेल स्वप्निलमागे ही कारवाई करण्यात आली.
अविनाश पोपटराव नाटक, बंडू बाळासाहेब जगदाळे, विजय अशोक वाडेकर, योगेश भगवान गंगेकर, चंद्रकांत शेख सोनोणे, अस्लम मुबारक सय्यद, मुजमील राजू पठाण, सचिन दशरथ लामखडे, कंटेनरवरील ड्रायव्हर अरुण माधयन, ट्रकचालक वेडीआप्पा गंगा दूरई, ट्रकचालक बाबासाहेब सखाराम बोरकर, संजय अशोक साबळे, राजेंद्र अशोक साबळे, राहूल मच्छिद्र गोरे, विकास भामरे, रवि गोरे यांचा आरोपींमध्ये समावेश आहे. सोपान रमेश गोरे पोलीस उप निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, नगर यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.
नगर जिल्ह्यामध्ये बायोडिझेलच्या संदर्भामध्ये गेल्या महिन्याभरापासून पुरवठा विभाग व पोलिस विभागाने धडक कारवाई मोहीम हाती घेतली आहे. याच अनुषंगाने सोमवारी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना नगर तालुक्यातील वाटेफळ येथे बायोडिझेलची सर्रासपणे विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
सोमवारी सकाळी नगर ते सोलापूर रोडवर वाटेफळ शिवारात हॉटेल स्वप्नील पाठीमागे विनापरवाना व बेकायदा बायोडिझलची काहीजण विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या नंतर उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांच्यासह पथकाने या ठिकाणी छापा टाकला. यावेळी 3 टँकर व 2 ट्रक अशी वाहने उभी दिसली. बायोडिझेल म्हणून विक्री करत असलेल्या व बायोडिझेल म्हणून विकत घेत असलेल्या व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले.
पोलिसांनी चार चाकी वाहनेही जप्त केली आहेत. काही वर्षापासून अशाच प्रकारची बायोडिझेलची विक्री होत असल्याचे तपासामध्ये पुढे आले आहे. ज्या ठिकाणी यांनी अशा प्रकारची विक्री केली आहे, त्याचीही माहिती घेण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे. नगर तालुक्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये अशा प्रकारची पहिलीच कारवाई झाली आहे.



























































