
अवैधरित्या वेश्या व्यवसाय चालविणार्या फुरसुंगीतील स्वर्ग लॉजवर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने कारवाई केली. येथून पोलिसांनी पाच पिडीत तरूणींची सुटका केली असून एका आरोपीला ताब्यात घेतले आहे.
फुरसुंगी रस्त्यावरील हरपळे वस्ती भागातील स्वर्ग लॉज याठिकाणी ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी एकाला ताब्यात घेत त्याच्यावर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत लॉजवर वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली होती. यानूसार पथकाने बनावट ग्राहक पाठवून खात्री केली असता लॉजवर वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे आढळून आले. यानूसार पोलिसांनी याठिकाणी छापा टाकून पाच पिडीत तरूणींची सुटका केली. तर, एकाला ताब्यात घेतले. तरूणींना रेस्कू फाउंडेशन येथे ठेवण्यात आले आहे.
सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ निरीक्षक भरत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक आश्विनी पाटील, अंमलदार राजेंद्र कुमावत, मनिषा पुकाळे, तुषार भिवनकर, हणमंत कांबळे, संदीप कोळगे, अमित जमदाडे यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.