अभिनेता नील नितीन मुकेशसह त्याचे संपूर्ण कुटुंब कोरोना पॉझिटिव्ह

बॉलिवूडमध्ये कोरोना झपाट्याने पसरत आहे. अनेक अभिनेते, अभिनेत्री कोरोनाग्रस्त झाले आहेत. गेल्या काही दिवसात अनेक कलाकारांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने अनेक चित्रपटांचे चित्रीकरण थांबले आहेत. रविवारी सकाळी अभिनेता अर्जुन रामपाल याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर अभिनेता नील नितीन मुकेश याने देखील तो कोरोनाग्रस्त असल्याचे सांगितले आहे. नील याच्या संपूर्ण कुटुंबालाच कोरोनाची लागण झाली आहे. यात त्याच्या दोन वर्षांच्या मुलीचा व 70 वर्षांचे वडिल नितीन मुकेश यांचा समावेश आहे.


नील नितीन मुकेश याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. ‘आम्ही घरात सर्व प्रकारची काळजी घेत होतो. घरातच राहत होतो. तरिही माझ्या कुटुंबातील सदस्य व मला कोरोनाची लागण झाली आहे. आम्ही सर्व घरातच क्वारंटाईन आहोत. डॉक्टरांनी दिलेली औषध घेत आहोत व सर्व नियमांचे पालन करत आहोत. तुमचे प्रेम व आशिर्वाद असू द्या’, असे नीलने इंस्टाग्रामवर लिहले आहे. नीलचे वडिल नितीन मुकेश, पत्नी रुक्मिणी, भाऊ नमन, मुलगी नुरवी हे देखील पॉझिटिव्ह असून फक्त आईचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.

 


दरम्यान त्याने एका मुलाखतीत मुलीला देखील कोरोना झाल्याचे सांगितले आहे. ‘माझ्या मुलीला नुरवीला देखील या व्हायरसची लागण झाली आहे हे सहन करणं किती कठिण आहे हे तुम्ही समजू शकता. तिचा रिपॉर्ट पॉझिटिव्ह आला आहे. पहिले दोन दिवस तिला ताप होता. मात्र आता तिची तब्येत ठिक आहे. यात सर्वात वाईट गोष्ट ही आहे की यातून बाहेर पडायचा कोणताही सोपा किंवा जलद मार्ग नाही. आम्हाला सर्वांना कोरोनाला हरवायचे आहे”, असे नील नितीन मुकेश याने सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या