मनसोक्त खा, पण तब्येतीला जपा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्वानंदी टिकेकर ही एक प्रतिभावान अभिनेत्री आहे. तिला आपण ‘दिल दोस्ती दुनियादारी’मधील मीनल म्हणून ओळखतो.  ‘आभाळमाया’ या मालिकेत तिने बालकलाकर म्हणून काम केले. स्वानंदी ‘सिंगिंग स्टार’या शोची विजेती होती. सुमधुर गाण्याने तिने प्रेक्षकांची मनं जिंकली. सध्या ती ‘अगं अगं सूनबाई काय म्हणता सासूबाई’ मालिकेत दिसते. स्वानंदीने ‘इंडियन आयडॉल मराठी’साठी सूत्रसंचालनही केले. स्वानंदी म्हणजे एकदम ऑल राऊंडर कलाकार.

स्वतःला फिट ठेवणे ही स्वानंदीची लाइफस्टाइल आहे. ती सांगते, कलाकारांसाठी फिट, हेल्दी दिसणे खूप गरजेचे आहे. उत्तम आरोग्य  पहिले प्राधान्य आहे. कारण स्वतःची काळजी नाही घेतली तर लगेच दुसऱ्या दिवशी ते चेहऱ्यावर दिसून येते.

शूटिंगला चौदा तासांची शिफ्ट असते, म्हणून स्वानंदी घरून ब्रेकफास्ट घेऊन सेटवर जाते. बहुधा ब्रेकफास्टला ओव्हरनाइट ओट्स घेऊन जाते. लंच घरचे असावे यासाठी तिचा प्रयत्न असतो. मात्र रोज शक्य नसल्याने ती सेटवर अंडी घेऊन जाते आणि तिथेच ऑम्लेट करून खाते. ती प्रयत्न करते की, संध्याकाळी 7-8 नंतर सेटवर काही खायचे नाही. त्यातही जितके घरचे खाता येईल तितके खायचे.

स्वानंदीचे म्हणणे आहे की, खाणे-पिणे नीट सांभाळले आणि व्यवस्थित सात-आठ तासांची झोप घेतली म्हणजे चेहरा खूप छान खुलून येतो. काय खाता, यापेक्षा कधी खाता हे जास्त महत्त्वाचे आहे.  तिच्यासाठी आवडत नाही असे जेवणात काही नाही. चाट, बटर चिकन, छोले भटुरे, चायनीज फूड, सुशी (तयार व्हिनेगर केलेला तांदूळ जपानी डिश) हे तिला फार आवडतात. आईच्या हातची इडली, सांबर-डोसा तिला आवडतो. स्वानंदी उत्तम सुगरण आहे. ती कोणत्याही डाळीचे उत्तम डोसे बनवते. कढीसुद्धा खूप छान बनवते. वेळ मिळाला की, मस्त उत्तम स्वयंपाक करते. तिला गोड पदार्थाची आवड जास्तच. जिलेबी, रबडी, आमरस, पुरणपोळी, वॉफल, ब्राऊनी हे भारीच प्रिय.

स्वानंदी बाहेर हॉटेलमध्ये जेवायला गेली की, सगळं खाते. मग तिथे डाएट वगैरे नाही पाळत. खायची इच्छा झाली तर मन न मोडता मनमोकळेपणाने खाते आणि जेव्हा खायची इच्छा नसेल तर काहीही झालं तरी ती खात नाही. स्वानंदी सांगते, प्रोटीन जास्त आणि कार्बोहायड्रेट्स कमी असलेले पदार्थ जेवणात असावेत. भाज्या भरपूर खा, दही-ताक याचाही आपल्या डाएटमध्ये समावेश करा.

स्वानंदीने तिच्या पाककलेचा एक मजेशीर किस्सा सांगितला, तो असा की,  सुरुवातीला जेव्हा ती स्वयंपाक करायला शिकली, तेव्हा तिने उपमा करायचा प्रयत्न केला. दुर्दैवाने तो उपमा अगदी दगडासारखा कडक झालेला.

ती सांगते, अन्न ही जीवनशैली आहे. एका दिवसात ती बदलता येणे शक्य नाही.  बदलाची हळूहळू सवय करावी लागते. खाताना मन  अजिबात मोडू नका, पण तब्येतीला जपा. डाएट हे वजन कमी करण्यासाठी नसून फिट आणि हेल्दी राहण्यासाठी असते. अन्नाकडे  त्या दृष्टीने बघा. मग तुम्हाला काही पदार्थ न खाण्याचा पश्चाताप होणार नाही.

 – मृदा झरेकर, म. ल. डहाणूकर कॉलेज