
सामना ऑनलाईन । मुंबई
बॉलीवूडमधल्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीने तिच्यासोबत घडलेला एक धक्कादायक प्रकार पहिल्यांदाच सांगितला आहे. आपल्यासोबत घडलेला हा प्रकार कास्टींग काऊचप्रमाणेच असल्याचंही तिचं म्हणणं आहे. हॉलीवूडमधल्या अभिनेत्रींनी त्यांवर झालेल्या लैंगिक छळाच्या कहाण्या #metoo मोहिमेद्वारे मांडल्या होत्या. या अभियानानंतर बॉलीवूडमधल्या अभिनेत्रीही या घाणेरड्या प्रकारांबाबत बोलायला लागल्या आहेत. अनेक चित्रपटात बालकलाकाराची भूमिका साकारणाऱ्या बुजुर्ग अभिनेत्री डेझी इराणी यांनीही लहान असताना त्यांच्यावर बलात्कार झाल्याचं सांगितलं होतं. त्यापाठोपाठ या प्रसिद्ध अभिनेत्रीने तिच्यासोबत घडलेल्या प्रकाराबाबत सांगितल्याने बॉलीवूड पुन्हा एकदा हादरलं आहे.

‘वीरे दि वेडिंग’ या गाजलेल्या चित्रपटातील अभिनेत्री स्वरा भास्कर ही तिच्या बोल्ड वक्तव्यांसाठी ओळखली जाते. या चित्रपटातील तिचा हस्तमैथुनाचा सीनमुळे ती प्रचंड चर्चेत आली होती. स्वराने बॉलीवूडमधल्या गैरप्रकारांबाबत बोलताना तिच्यासोबत घडलेला प्रसंग सांगितला. ती म्हणाली की ‘मी एका मोठ्या निर्मात्याला भेटायला गेले होते. मी पोहोचले तेव्हा तो निर्माता आला नव्हता. तिथे फक्त त्याचा मॅनेजर होता. तो मॅनेजर सतत मला माझा पत्ता विचारत होता. त्यानंतर मी तिथून निघण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने माझ्या कानाला किस केले व आय लव्ह यू बेबी म्हणाला. यामुळे मी वैतागून मागे सरकले त्यामुळे माझे केस त्याच्या तोंडात गेले. या अशा प्रकारच्या घटना देखील कास्टिंग काऊचचाच एक भाग आहेत’ स्वराने सांगितलेल्या या घटनेमुळे बॉलीवूडमध्येही हे प्रकार सर्रास घडत असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणी म्हणून आली असताना स्वराने हा प्रकार सांगितला.
बॉलिवूडमधील फक्त स्वरा भास्करच नाही तर राधिका आपटे, सुरवीन चावला, उषा जाधव, रिचा चढ्ढा, काल्की कोएचिन, टिस्का चोप्रा, चित्रागंदा सिंग या अभिनेत्रींनी देखील कास्टिंग काऊच होत असल्यााचा आरोप केलेला आहे.




























































