
मुंबई महापालिकेने नुकत्याच मांडलेल्या 52 हजार कोटींच्या अर्थसंकल्पात माजी नगरसेवकांना विकासनिधी देताना भाजपच्या माजी नगरसेवकांना जादा निधीची तरतूद करून राज्यातील सत्ताधाऱयांची मर्जी राखण्याचा प्रयत्न केला आहे. महापालिकेने अर्थसंकल्पात भाजपच्या माजी नगरसेवकांना प्रत्येकी 3 कोटींचा निधी तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या माजी नगरसेवकांना 1 कोटीच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. याप्रकरणी प्रशासक इकबालसिंह चहल यांची आज शिवसेनेच्या माजी नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन पक्षपातीपणा थांबवा आणि सर्व नगरसेवकांना समान निधीचे वाटप करा नाही तर आंदोलन करू, असा इशारा दिला आहे.
मुंबई महापालिकेने नुकताच 2023-24 चा 52 हजार कोटींचा अर्थसंकल्प जाहीर केला, मात्र या अर्थसंकल्पात शिक्षण आणि आरोग्य या महत्त्वाच्या खात्यांचा आर्थिक निधी कमी केला आहे तर विविध प्रकल्प, पायाभूत आणि नागरी सुविधा, विकासकामांवर भर देत त्यातील निधीतील तरतुदींमध्ये मोठी वाढ केली आहे. हे करत असतानाच विविध विकासकामांसाठी माजी नगरसेवकांना मिळणाऱया निधीत पक्षपातीपणा करत भाजपच्या माजी नगरसेवकांना झुकते माप देण्यात आले आहे.
- भाजपच्या प्रभागांसाठी प्रत्येकी 3 कोटींच्या निधीचा तरतूद करण्यात आली आहे, तर भाजप वगळता शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्षातील माजी नगरसेवकांना मात्र प्रत्येकी 1 कोटीच्या विकासनिधीची तरतूद करण्यात आली आहे. शिवसेनेच्या माजी नगरसेवकांच्या 91 प्रभागांत विकासनिधी वाटपात पक्षपातीपणा करण्यात आला आहे.
- पालिकेच्या मनमानी कारभाराविरोधात माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर आणि माजी सभागृह नेत्या विशाखा राऊत यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने महापालिका प्रशासक इकबालसिंह चहल यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक सुरेश पाटील, बाळा नर, दत्ता पोंगडे, शेखर वायंगणकर, ऋतुजा तारी, हाजी हालिम खान, सचिन पडवळ उपस्थित होते.




























































