थोडी जरी लाज शिल्लक असेल तर राजीनामा द्या, निवडणुकीला उभे राहा , आदित्य ठाकरेंनी सुनावलं – आदित्य ठाकरे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काही लोकांना बाळासाहेबांच्या पुत्राला मुख्यमंत्री पदावरून खाली उतरवला यातच आनंद मिळतो. त्यांना कितीही दिलं तरी ते त्यांना कमी पडतं, कारण त्यांच्या राक्षसी महत्वाकांक्षा असतात. बंडखोर आमदारांमध्ये देखील दोन गट आहेत हे लवकरच सर्वांना कळेल. तुम्ही सोडून गेलात याच्याबद्दल माझ्या मनात राग किंवा द्वेष नाही, मात्र दुःख नक्कीच आहे. तुम्ही गेलात तिथे सुखी राहा, परंतु तुमच्यात थोडी जरी लाज शिल्लक असेल तर तुम्ही राजीनामा द्या आणि पुन्हा निवडणुकीला उभे राहा. मग जनता जो कौल देईल तो मला मान्य असेल, असे युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे म्हणाले.

ठाकरे परिवारातील सदस्य विधिमंडळात आला हीच तुमची पोटदुखी आहे. सगळं ठीक चाललं होतं. आता जे बंडखोर आमदार तिथे मंत्रिपदासाठी हात पाय मारत आहेत त्यांना आपल्याकडे मंत्रीपदे होती. मी राजकारणात आल्यापासून माझ्या निकटवर्तीयांनी मला सांगितलं होतं की राजकारणात चांगल्या लोकांना स्थान नसतं. मात्र आत्ताची जी परिस्थिती आहे, त्यावरून ते खरे वाटत आहे. शिवसैनिक हा राजकारणी कधीच नसतो. तो नेहमी लोकांची सेवा करत असतो. आपण सेवा करत राहिलो आणि राजकारणात कमी पडलो म्हणून आपण आज हा दिवस बघत आहोत. अशी खंत शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली. रविवारी मुंबईतील दहिसर येथे आयोजित निष्ठा यात्रेत ते बोलत होते.

ज्यांना लहानपणापासून पाहत आलो ज्यांना काका अशी हाक मारत त्यांच्या सोबत प्रचार करायचो अशी माणसे सोडून जातात तेव्हा दुःख होते. सरकार आल्यावर त्यांना मंत्रिपदं, महामंडळं द्यायची तरी सुद्धा हे पळून गेले. मात्र आज शाखांमध्ये भेटी दिल्या तेव्हा समजत आहे की सामान्य शिवसैनिक हा जागच्या जागीच आहे. प्रत्येक मतदारसंघात आजही असे महिला आणि पुरुष उमेदवार तयार आहेत जे आजही लढायला आणि जिंकायला तयार आहेत. असे ठाकरे म्हणाले.

ज्यांना शिवसेनेत परतायची इच्छा आहे त्यांनी परत या, मातोश्रीची दारं तुमच्यासाठी आजही खुली आहेत. आमचं मन आणि हृदय मोठ आहे. काहींनी आमच्या विश्वासाचा गैरफायदा घेतला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शस्त्रक्रिया झाल्याने ते 2 महिने कोणाला भेटू शकले नाहीत. तरीही काम थांबले नव्हते. या परिस्थितीत तुम्ही स्वतःच्या फायद्यासाठी आमदारांची जुळवाजुळव करत होतात. आजारपणाचा फायदा घेत तुम्ही पक्ष फोडला, याचे दुःख मला आहे. मी राज्यभर दौरा केला असता सर्व नागरिकांच्या डोळ्यात उद्धव ठाकरे यांच्या बद्दल प्रेम बघितले आहे. राजकारणात आता चांगल्या लोकांना स्थान निर्माण करण्यासाठी आपण काम करणार आहोत. स्वतःच्या महत्वाकांक्षांसाठी नाही तर लोकांसाठी लढणारा माणूस आम्ही पुढे नेणार आहोत. असा विश्वास यावेळी ठाकरे यांनी दिला.