
‘महाराष्ट्रात काही अर्बन नक्षल स्वयंसेवी संस्थांनी इंडिया आघाडीला छुपा पाठिंबा दिला’ असे बेताल विधान करणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांनी बेजबाबदार व खोटे वक्तव्य केले. त्यांनी दावा केलेल्या अर्बन नक्षल संस्थांची यादी पोलिसांना द्यावी, अन्यथा महाराष्ट्राच्या जनतेची जाहीर माफी मागावी, अशी मागणी करीत अॅड. बाळकृष्ण निढाळकर यांनी शिंदेंना कायदेशीर नोटीस पाठवली आहे.
अॅड. निढाळकर हे ‘निर्भय बनो’ लोकचळवळीचे सदस्य असून त्यांनी अॅड. असीम सरोदे, अॅड. रमेश तारू व अॅड. संदीप लोखंडे यांच्यामार्फत शिंदेंना नोटीस पाठवली आहे. मुख्यमंत्री पदावरील व्यक्तीने सतत राजकीय वागणे व बोलणे अयोग्य आहे. महाराष्ट्रात शेतकऱयांचे अनेक प्रश्न आहेत. पेट्रोल-डिझेलचे भाव वाढले आहेत. याशिवाय बेरोजगारी, महिलांची सुरक्षा आदी गंभीर विषय आहेत. यावर गांभीर्याने बोलण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी बेताल राजकीय विधाने करणे राज्यातील जनतेला वेदना देणारे आहे, असे म्हणणे नोटिसीद्वारे मांडले आहे.
भाजपमैत्रीचा परिणाम दिसतोय!
सातत्याने बेताल वक्तव्य करणे, राजकीय स्वरूपाचे आरोप करत राहणे यातून मुख्यमंत्रीपदाची प्रतिष्ठा घालविण्याचाच उपक्रम करीत आहात. आपल्याविरोधात मत मांडणारे सगळेच देशद्रोही आहेत, असा भ्रम पसरवणाऱया धर्मांध व जातीयवादी भाजपसोबत असण्याचा परिणाम तुमच्या वक्तव्यातून स्पष्टपणे दिसतो, असा सडेतोड आरोप अॅड. निढाळकर यांनी केला आहे.
लोकशाही रक्षणासाठी ‘निर्भय बनो’
’निर्भय बनो’ ही लोकशाही रक्षणासाठी काम करणारी लोकचळवळ आहे. ही स्वयंसेवी संस्था नाही. आम्ही महात्मा गांधी यांचे अहिंसक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधानिक विचार मानणारे व देशावर प्रेम करणारे नागरिक आहोत. आम्हाला कोणत्याही जाती-धर्माच्या नावाने होणारी हिंसा मान्य नाही, असे अॅड. निढाळकर यांनी म्हटले आहे.
































































