
सामना प्रतिनिधी । रत्नागिरी
रत्नागिरी नगर परिषद व श्री इव्हेंट मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी स्टेडिअम येथे आयोजित एरोमॉडेलिंग शोमध्ये अबाल वृध्दांनी विमानांच्या प्रात्यक्षिकांसह विमानांचा इतिहास जाणून घेतला. राईट बंधूनी तयार केलेल्या पहिल्या विमानापासून सध्या गाजर असलेल्या राफ़ेल पर्यंत विमानांची प्रात्यक्षिक दाखविण्यात आली. कार्यक्रमाच्या वेळी ईव्हीएम व्हीव्हीपॅट मशीनच्या जनजागृतीबाबत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी नागरिकांना आवाहन केले.
प्रत्येकाच्या मनात विमानाविषयीचे कुतूहल कायम असते… विमान उडते कसे ? ते हवेत तरंगते कसे ? ते टेकऑफ आणि लँडिंग करते कसे? असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात … लहानग्यांसह तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या मनात येणाऱ्या या सगळ्या प्रश्नाची उत्तरे देणारा हा शो रत्नागिरी नगर परिषद आणि श्री इव्हेंट मॅनेजमेंट यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. या शो करीता विविध विमानांची मॉडेल्स रत्नागिरी मध्ये आणली होती.गेली चाळीस वर्षे देशाच्या विविध शहरांमध्ये एरो मॉडेलिंग चे शो केलेले सदानंद काळे , अथर्व काळे आणि त्यांची टीम हा शो सादर करणार आहेत … यावेळी कार्यक्रमाला म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत, खासदार विनायक राऊत, नगराध्यक्ष राहुल पंडित, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे, प्रांताधिकारी अमित शेडगे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी अरविंद माळी, तहसिलदार मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुशांत बनसोडे आदी उपस्थित होते.
































































