माजी विद्यार्थ्यांची २५ वर्षांनी भरली शाळा, भैरवनाथ विद्यालयासाठी ४१ हजारांची देणगी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । भिगवण

शाळेमध्ये केलेली दंगामस्ती, नंबर मिळवण्यासाठी केलेली स्पर्धा तर शालेय जीवनातील अनेक प्रसंगाच्या एक ना अनेक अशा आठवणींना उजाळा देत तब्बल २५ वर्षांनी भिगवणच्या भैरवनाथ विद्यालयातील माजी विद्यार्थी- विद्यार्थींनींचा मेळावा पार पडला.

रयत शिक्षण संस्थेच्या भैरवनाथ विद्यालयातील सन १९९३-९४ च्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा पार पडला. यावेळी करंजकोप शाखेचे प्राचार्य प्रमोद नलगे, भैरवनाथ विद्यालयाचे प्राचार्य अशोक बंदिष्टी, निवृत्त शिक्षक रामचंद्र बचूटे, अनंता मराडे, सुनंदा शेवते, राजेंद्र कोकाटे, स्थानिक स्कूल कमिटी सदस्य नितीन चितळकर, डॉ. काशिनाथ सोलनकर आदी मान्यवर उपस्थित होते.

अनेक वर्षांनी एकत्र येत पंचवीस वर्षांपूर्वी घडलेल्या आठवणी कथन केल्या. तसेच यावेळी शाळेविषयी असणारी आत्मीयता व शिक्षकांनी अध्यापन करताना केलेली शिक्षा व त्यातून विद्यार्थ्यांनी सुधारलेल्या चुका यावर माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी गुरुवर्य शिक्षकांचा माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी गजानन गुणवरे, सतिश सोलनकर, किर्ती रायसोनी, प्रज्ञा धुमाळ, पदमाकर शिंदे, महेंद्र पोंदकुले आदींनी मनोगत व्यक्त केले तर कार्यक्रमाचे आयोजन सुनिल थोरात, उमाकांत वाघ, आरंजय कळंत्रे, संजय चोरमले, राजेंद्र हगारे, प्रदीप सावंत, अण्णा मलगुंडे, युवराज काळंगे, सुनील सरोदे, सुनील पवार आदींनी केले. यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र भोजनाचा आनंद घेतला.

अनेक माजी विद्यार्थी राजकीय, शासकीय, शैक्षणिक, सामाजिक, व्यावसायिक क्षेत्रात कार्यरत आहेत. याबाबत चर्चा रंगली त्याचप्रमाणे महिलांदेखील गृहीणी ते व्यावसायिक क्षेत्रात प्रावीण्य मिळवले असल्याचे पाहून शिक्षकांनी समाधान व्यक्त केले. यावेळी शाळेच्या मुलभूत सुविधेसाठी माजी विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकीतून ४१ हजारांची रक्कम जमा केली. सूत्रसंचालन रवींद्र गडकर यांनी केले आभार हनुमंत भोसले यांनी मानले.

शिक्षकांनी व्यक्त केल्या भावना
विद्यार्थीदशेत असताना आम्हाला काहीवेळा तुम्हाला मारही द्यावा लागला. खट्याळ वाटणारी मुलं आज चांगल्या पदावर काम करत आहेत. त्याचप्रमाणे समाजात त्यांना चांगली प्रतिष्ठा असल्याचे समजून आनंद होत आहे. आज तुम्ही मोठे झाले आहात त्याचप्रमाणे तुमच्या मुलांनादेखील चांगले शिक्षण देवून उद्याच्या उज्ज्वल हिंदुस्थानचे आदर्श नागरीक बनवा, असा मौलिक संदेश माजी विद्यार्थ्यांना गुरुजणांनी केला.