
सामना प्रतिनिधी । चंद्रपूर
कोरपना तालुक्यातील अंबुजा सिमेंट कंपनीमुळे प्रकल्प बाधित झालेल्या आदिवासी व इतर शेतकऱ्यांना न्याय मिळावा, यासाठी मंगळवार पहाटेपासून प्रकल्पाच्या प्रवेशद्वारावर प्रकल्पग्रसतांनी ठिय्या मांडला. यामुळं सिमेंटची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली.
अंबुजाच्या प्रकल्पबाधित बेरोजगारांनी तब्बल 60 दिवस चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण केले होते. नगरसेवक पप्पू देशमुख यांनी या प्रकल्पग्रस्त आदिवासी शेतकऱ्यांसाठी साठ किलोमीटरची पदयात्रा सुध्दा काढली होती. त्यासोबतच त्यांनी 2018 रोजी अंबुजाने अधिग्रहित केलेल्या शेतजमिनीवर ताबा घेऊन आंदोलन सुद्धा केले. या आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी दोन महिन्यात कंपनीच्या विरोधात कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. योग्य कारवाई झाली नाही व प्रकल्पबाधित लोकांना न्याय मिळाला नाही तर अंबुजाचे डिस्पॅच रोखणार, असा इशारा देशमुख यांनी दिला होता. त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी देशमुख यांनी केली. आज पहाटेच्या अंधारात प्रकल्पग्रस्तांसह पप्पू देशमुख यांनी अचानक अंबुजा सिमेंट कंपनीच्या गेटसमोर ठिय्या मांडला. कंपनीमध्ये सकाळच्या शिफ्टला जाणारे कामगार व सिमेंटचे ट्रक व रेल्वे रोखण्यात आली.
जोपर्यंत अंबुजा सिमेंट कंपनी तसेच पकडीगुड्डम धरणामुळे प्रकल्पबाधित कुटुंबातील सदस्यांना तसेच ठेकेदारी मध्ये काम करणाऱ्या प्रकल्पबाधितांना वेज बोर्डमध्ये स्थायी नोकरी मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्यात येईल अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतलेली आहे.































































