
सामना ऑनलाईन । सोलापूर
सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे नाव देणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीच्या बैठकीनंतर जाहीर केले होते. विद्यापीठाचा नामविस्तार सोहळा आज पार पडणार आहे. या नामविस्ताराला शिवा संघटनेने विरोध केला आहे. पोलिसांनी या संघटनेच्या आठ कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. विद्यापीठ नामविस्तार कार्यक्रमात गोंधळ होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
तसेच सोलापुरातील विद्यापीठाचं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असा नामविस्तार करण्यास विरोध करणाऱ्या शिवा संघटनेच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास मुंबई हायकोर्टाने नकार दिला आहे. यावर दुपारनंतर निर्णय होण्याची शक्यता.
दरम्यान, नामविस्तार सोहळ्यात गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांनी गोंधळ घातला. पडळकर समर्थकांनी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या भाषणा दरम्यान ‘एकच चंद, गोपीचंद’ अशी घोषणाबाजी केल्याने गोंधळ निर्माण झाला.
शनिवारी राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये धनगर समाजाला आदिवासी समाजाप्रमाणे योजना लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय झाला. तसेच बऱ्याच कालावधींपासून सुरू असलेला सोलापूर विद्यापीठाच्या नामविस्ताराचा प्रश्नही सोडवण्यात आला. सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे नाव देण्याचा निर्णयही राज्य सरकारने घेतला. याच संबंधी आज महत्त्वाची बैठक होणार असून यानंतर नामविस्तार सोहळा पार पडेल. परंतु यास शिवा संघटनेने विरोध केला.


























































