
बाजारपेठेत विविध व्यापारी संघटनांच्या संयुक्त बैठकीत जाहीर केल्याप्रमाणे 200 ते 15 हजार रुपयांपर्यंतचा मनापा कडून आकारण्यात येणारा जाचक व्यावसाय परवाना शुल्क वसुलीचा निर्णय रद्द करण्यात यावा या मागणी करिता काँग्रेसच्या वतीने शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी शहरातील सुमारे 40 हजार व्यावसायिकांसाठी मनपा कार्यालया समोर दोन दिवसीय धरणे आंदोलन सुरू केले आहे. शहरातील व्यापारी, दुकानदारांचा आक्रोश मनपा आयुक्त, नगरसेवक, मनपा पदाधिकारी, आमदार, खासदार यांच्यापर्यंत काँग्रेस पोहोचविणार असल्याचे यावेळी बोलताना काळे म्हणाले. सोमवारी सकाळी काळे यांनी निवडक सहकाऱ्यांसमवेत चितळे रोड येथील शिवालयात जाऊन दिवंगत अनिल राठोड यांना अभिवादन करून धरणे आंदोलनाला सुरुवात केली.
आंदोलनाला सुरुवात करताना किरण काळे म्हणाले, आधीच कोणत्याही कारणावरून बाजारपेठ बंदची हाक वारंवार दिली जाते. समाज माध्यमांवर तसे संदेश फिरतात. यामुळे ग्राहक बाजारपेठेकडे फिरकत नाहीत. व्यवसायिकांचे नुकसान होते. त्यामुळे धरणे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांनी बाजारपेठ, दुकाने बंद न ठेवू नयेत. आपला धंदा बंद ठेवून स्वतःचे नुकसान करून घेऊ नये. आंदोलनस्थळी व्यापाऱ्यांनी गर्दी करू नये. त्यांनी आपले व्यावसायिक नुकसान न करता आपला व्यवसाय सुरू ठेवत आंदोलनातील सहभाग कायम ठेवावा, असे जाहीर आवाहन काळे यांनी केले आहे. शहरातील व्यावसायिकांच्या धंद्यावर सततचे बंद आणि कोरोना काळानंतर झालेला विपरीत परिणाम पाहता इथून पुढील काळात शहरात बाजारपेठ बंदला काँग्रेसचा विरोध असल्याचे काळे यावेळी स्पष्ट केले.
शनिवारी रात्री बाजारपेठेतील सप्तक सदन बँक्वेट हॉल येथे शहरातील विविध व्यावसायिक व्यापारी संघटना, असोसिएशनची प्रथमच संयुक्त बैठक पार पडली होती. यावेळी सर्व संघटनांच्या प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होती. या बैठकीतच शहर काँग्रेसने किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली धरणे निर्णय आंदोलन करण्याचे जाहीर करण्यात आले होते. बैठकीला काळे यांच्यासह व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सावेडी, केडगाव उपनगरातील दुकानदार देखील सहभागी झाले होते.
काळे म्हणाले, मनपाला शहरातील व्यावसायिक म्हणजे सोन्याची कोंबडी वाटतात. शासन शॉप ॲक्ट लायसन शुल्क गेल्या अनेक वर्षांपासून घेत आहे. व्यावसायिक ते भरतात. मग ते दिल्यानंतर पुन्हा त्याच कारणासाठी व्यावसायिक परवा शुल्क का म्हणून त्यांनी द्यायचे ? मनपा महासभेत नगरसेवकांनी आवाज उठवायला हवा होता. त्यावेळी ते शांत बसले. मात्र आता काही लोक पत्रकबाजी करुन अकलेचे तारे तोडत आहेत. हेच त्यांनी सभागृहात हा जाचक निर्णय होत असताना त्याला विरोध दर्शवला असता तर त्याचे स्वागत केले असते. त्यामुळे व्यापाऱ्यांची दिशाभूल करण्यासाठी काही लोक सुपारी घेऊन काम करीत आहेत. व्यापाऱ्यांचे यामुळे नुकसान करण्याचा डाव काही लोकांचा आहे.
दिवंगत शिवसेना नेते अनिलभैय्या राठोड यांचा व्यापाऱ्यांना मोठा आधार वाटायचा. मात्र दुर्दैवाने आज ते हयात नाहीत. ते नसले तरी त्यांचा वारसा, विचार डोळ्यासमोर ठेवून शहरात काँग्रेस पक्ष व्यापारी, दुकानदारांच्या पाठीशी भक्कमपणाने उभी आहे. व्यापाऱ्यांसाठी रस्त्यावर उतरण्याची काँग्रेसची तयारी आहे, असे यावेळी काळे म्हणाले.



























































