
जिल्ह्यात पूर, अतिवृष्टीमुळे आतापर्यंत पाच महिन्यांत 70 हजार 900 हेक्टरवर नुकसान झाले आहे. शासनाच्या नवीन निकषानुसार नुकसानभरपाई देण्यासाठी 75 कोटी 8 लाख रुपयांची प्रशासनाने शासनाकडे मागणी केली आहे. पहिल्या टप्प्यात 28 कोटी 94 लाख रुपये मिळाले आहेत. लाभार्थ्यांच्या खात्यांवर लवकरच ही रक्कम जमा केली जाईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
नगर जिल्ह्यात यंदा खरिपाच्या हंगामात सतत अतिवृष्टी, पाऊस व अन्य कारणाने शेतपिकांचे नुकसान झाले आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्यांत जिल्ह्यामधील शेवगाव, पाथर्डी, नगर तालुक्यात पूर, अतिवृष्टी व पावसाने नुकसान झाले आहे. काही शेतकऱ्य़ांच्या तर जमिनी अक्षरशः खरडून गेल्या, घरांत पाणी शिरून संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले. मात्र, दोन महिने उलटले तरी अजूनही नुकसानभरपाई मिळाली नाही. दिल्या जाणाऱ्य़ा मदतीत नुकताच बदल करून रकमेत वाढ केली आहे. त्यानुसार प्रतिहेक्टरी जिरायती क्षेत्रासाठी 10 हजार रुपये, बागायती क्षेत्रासाठी 15 हजार रुपये व फळबागांसाठी 25 हजार रुपये दिले जाणार आहेत. आधी जिल्हा प्रशासनाने आधीच्या निकषानुसार 50 कोटींची मागणी केली होती. आता नव्याने 75 कोटी 8 लाखांची मागणी केली आहे. त्यातील 28 कोटी 84 लाख रुपये मिळाले आहेत. लवकरच अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्य़ांच्या खात्यावर ही रक्कम जमा केली जाईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
अतिवृष्टी, पूर, जास्तीचा पाऊस या कारणाने झालेल्या नुकसानीचे कृषी, महसूल विभागाकडून पंचनामे केले जातात. 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतकऱ्य़ांना जिरायती, बागायती व फळबागा अशा निकषानुसार भरपाई दिली जाते. मात्र, नुकसानीची टक्केवारी कशी ठरते हे कृषी विभागाच्या अधिकाऱ्य़ांनाही सांगता येत नाही. शिवाय 33 टक्क्यांपेक्षा कमी नुकसान झालेल्यांना भरपाई दिली जात नाहीच. पण, 33 टक्क्यांपेक्षा कमी नुकसान झालेल्याची कृषी विभागाकडे साधी नोंदही केली जात नाही. 33 टक्क्यांपेक्षा कमी नुकसान झालेल्या शेतकऱ्य़ांनाही मदत मिळणे गरजेचे आहे.




























































