नगरच्या कापडबाजारातील अतिक्रमणे महापालिकेने हटविली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कापडबाजारातील हातगाडी, तसेच पथविक्रेत्यांची अतिक्रमणे हटविण्यात आली. महापालिका अतिक्रमणविरोधी पथकाने ही कारवाई केली. या कारवाईमुळे अतिक्रमणधारकांची एकच धांदल उडाली.

कापडबाजार, मोचीगल्ली, गंजबाजार, घासगल्ली, शहाजी रोड, नवी पेठ आदी भागांतील हातगाडीधारकांची अतिक्रमणे कायमस्वरूपी काढावीत, अशी मागणी नगर व्यापारी महासंघाने आयुक्त डॉ. पंकज जावळे यांच्याकडे केली होती. अतिक्रमणे न काढल्यास पुन्हा उपोषणाचा इशारा व्यापाऱयांनी दिला होता. आयुक्त जावळे यांनी बाजारपेठेतील अतिक्रमणे काढण्यात येतील, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार मनपाच्या अतिक्रमणविरोधी पथकाने आज कापडबाजार, मोचीगल्ली, शहाजी रोड येथे अतिक्रमण हटाव मोहीम राबविली.

अतिक्रमणविरोधी पथकाने हातगाडय़ा, तसेच अन्य साहित्य जप्त केले. या कारवाईमुळे बाजारपेठेतील रस्त्याने मोकळा श्वास घेतला. पथविक्रेत्यांनी अतिक्रमण कारवाईविरोधात मनपात निदर्शने करून मुलाबाळांसह उपोषणाचा इशारा दिला आहे. राष्ट्रीय पथविक्रेता तरतुदीनुसार
‘हॉकर्स झोन’ होत नाहीत तोपर्यंत बाजारपेठेत हॉकर्सवरील नियोजित अतिक्रमणांच्या नावाखाली केली जाणारी कारवाई थांबविण्याची मागणी पथविक्रेत्यांनी मनपाकडे केलेली आहे. यामुळे बाजारपेठेतील अतिक्रमणांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

नो एण्ट्री पॉइंट, पार्किंगसाठी अंमलदारांची नेमणूक

z शहरातील कापडबाजार, सर्जेपुरा, तेलीखुंट, दिल्लीगेट, चितळे रोड, माळीवाडा या बाजारपेठेच्या भागांत अतिक्रमणे, तसेच वाहतुकीची समस्या गंभीर आहे. त्यामुळे नागरिकांनी पायी चालणेही कठीण होते. या संदर्भात जिल्हाधिकाऱयांनी नोटिफिकेशनद्वारे नो एण्ट्री पॉइंट आणि पार्ंकग व्यवस्था निश्चित केली. मात्र, त्याची अंमलबजावणी होत नसल्याने ‘जागरूक नागरिक मंच’चे अध्यक्ष सुहास मुळे यांनी प्रतीकात्मक पोलीस फ्लेक्स उभे करून ‘गांधीगिरी’ आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. या इशाऱयाची दखल घेत शहर वाहतूक शाखेने दुसऱयाच दिवशी बाजारपेठेत अंमलदारांची नेमणूक केली आहे. वाहतूक शाखेचे अधिकारी कैलास वाघ यांनी केलेल्या कार्यवाहीबाबत मुळे यांना माहिती दिली आहे.