
जिल्ह्यात लसीकरणाचा वेग वाढला असून, अनेक केंद्रांवर लसींचा तुटवडा जाणवत आहे. शासनाकडून लसींचा अनियमित पुरवठा होत असतानाही जिल्हा प्रशासनाकडून मिळणाऱया लसींचे योग्य नियोजन केले जात असल्याने लसीकरण मोहिमेस वेग आला आहे. गुरुवारी (दि.15) दुपारपर्यंत जिह्यातील 2 लाख 93 हजार 502 जणांनी पहिला, तर 32 हजार 291 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. त्यामुळे जिह्यात एकूण 3 लाख 25 हजार 793 लसीकरण पूर्ण झाले आहे.
जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा दुसरा टप्पा सुरू आहे. या मोहिमेत लसीकरणासाठी आरोग्य कर्मचारी, महसूल कर्मचारी, पोलीस कर्मचारी, पंचायतराज, गृह व शहरी कामकाज कर्मचारी, रेल्वे सुरक्षा बल याशिवाय 45 वर्षांपुढील व्यक्ती यांच्यासाठी लसीकरण मोहीम राबविली जात आहे. यातील गुरुवारी दुपारी 12 वाजेपर्यंत 3 लाख 48 हजार 158 जणांनी नोंदणी केलेली आहे. त्यापैकी 2 लाख 93 हजार 502 जणांनी पहिला डोस, तर 32 हजार 291 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. लसीकरणाची एकूण संख्या 3 लाख 25 हजार 793 झाली आहे. प्रशासनाने लसीकरणाचे जे उद्दिष्ट ठेवले होते, त्यापैकी पहिला डोस घेणाऱयांची टक्केवारी 84.30, तर दुसरा डोस घेणाऱयांची टक्केवारी 9.27 एवढी आहे.
जिह्यात फेब्रुवारीच्या मध्यापासून कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. मार्चमध्ये या संख्येत मोठी वाढ झाली. एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ापासून तर दररोज दोन हजारांच्या पुढे कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. कोरोनाचा हा संसर्ग वाढू लागल्यामुळे कोरोना प्रतिबंधक लस घेण्याकडे नागरिकांचा कल वाढू लागला आहे. सुरुवातीला लसीकरणाबाबत नागरिकांमध्ये उदासीनता दिसून येत होती. मात्र, आता याबाबत मोठय़ा प्रमाणात जनजागृती झाल्यामुळे नागरिक स्वतःहून लसीकरणासाठी लसीकरण केंद्रांवर गर्दी करू लागले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून शासनाकडे लसींची मागणी वाढविण्यात आलेली आहे. परंतु, त्या प्रमाणात पुरवठा होत नसल्याने आरोग्य विभागाला लसीकरणाचे नियोजन करताना मोठी कसरत करावी लागत आहे.
सुट्टीच्या दिवशीही विक्रमी लसीकरण
n जिह्यात जिल्हा शासकीय रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, महापालिका हद्दीतील आरोग्य केंद्र तसेच जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत असलेली प्राथमिक आरोग्य केंद्र अशा 163 केंद्रांवर लसीकरणाची सोय करण्यात आलेली आहे. या केंद्रांवर दररोज लसीकरणात मोठी वाढ होताना दिसून येत आहे. नागरिक स्वतःहून लसीकरणासाठी केंद्रांवर गर्दी करीत आहेत. गेल्या आठवडय़ात लसींचा तुटवडा निर्माण झाल्याने अनेक केंद्रांवर लसीकरण बंद पडले होते. मात्र, मंगळवारी (दि.13) जिह्याला 45 हजार 500 डोस उपलब्ध झाल्याने आरोग्य विभागाने बुधवारी (दि.14) शासकीय सुट्टी असतानाही लसीकरण मोहीम सुरू ठेवली. त्यामुळे सुट्टीच्या दिवशीही जिह्यात विक्रमी 18 हजार 775 जणांचे लसीकरण करण्यात आले.
अनेक केंद्रांवर लसींचा तुटवडा
जिह्यात लसीकरणाने वेग घेतला असल्यामुळे सध्या अनेक केंद्रांवर लसींचा तुटवडा जाणवत आहे. जिह्यासाठी 2 दिवसांपूर्वी 45 हजार 500 लसींचा पुरवठा झालेला होता. त्यापैकी गुरुवारी (दि.15) दुपारपर्यंत जिह्यात अवघे 21 हजार 10 डोस शिल्लक होते. त्यात कोविशिल्डचे 19 हजार 850, तर कोवॅक्सीनचे 1160 डोस शिल्लक होते. यामध्येही जिह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना वितरित केले. 17 हजार 330, तर महापालिकेकडे 2520 डोस शिल्लक होते.


























































