
नगर तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वेगवेगळ्या गॅस कंपनीच्या व्यावसायिक वापराच्या गॅस सिलिंडरमध्ये घरगुती वापराचा गॅस भरून बनावट लेबल सील करून ग्राहकांची फसवणूक करणाऱ्य़ा अवैध रिफिलिंग सेंटरवर नगर तालुका पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत दोन लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपीला अटक करण्यात आली आहे. अशोक रघुनाथ घाडगे (रा. वडगाव तांदळी, ता. नगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
नगर तालुक्यातील वडगाव तांदळी येथे एकजण घरगुती गॅस लोखंडी पाइपच्या साहाय्याने व्यावसायिक वापराच्या गॅस सिलिंडरमध्ये भरत असून लोकांच्या जीवाला धोका निर्माण होईल, अशा रीतीने साठा करीत असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांना मिळाली होती. त्यांच्या सूचनेवरून पोलीस पथकाने वडगाव तांदळी येथील केसरी फिल्म सेंटरवर छापा टाकला. या कारवाईत घाडगे हा अवैधपणे घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरला लोखंडी पाइप लावून व्यावसायिक वापराच्या गॅस सिलिंडरमध्ये गॅस भरताना आढळून आला.
पोलिसांनी त्याच्याकडील 32 हजार रुपये किमतीच्या भारत गॅस कंपनीच्या सील नसलेल्या व्यावसायिक 16 गॅस सिलिंडर, तीन हजार रुपये किमतीचे 3 लहान गॅस सिलिंडर, पाच हजार रुपये किमतीच्या घरगुती वापराच्या सील नसलेले पाच सिलिंडर, एक हजार रुपये किमतीचा इण्डेन कंपनीचा सिलिंडर, 42 हजार रुपये किमतीच्या इंडियन गॅस कंपनीच्या व्यावसायिक वापराचे सील नसलेले 21 सिलिंडर, दोन लाख रुपये किमतीचा इंडियन गॅस नाव लिहिलेला पिकअप टेम्पो, 2 लहान गॅस पाइप, भारत गॅसचे प्लॅस्टिकचे लेबल, गॅस टाकी सील करण्याचे रोड बॉक्स असा 2 लाख 83 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी सहायक फौजदार भास्कर लबडे यांच्या फिर्यादीवरून गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप पुढील तपास करीत आहेत.





























































