नगर महापालिका स्थायी समिती सभापतिपदासाठी शुक्रवारी निवडणूक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतिपदासाठी 18 फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी मंगळवारी सकाळी याबाबत आदेश जारी केला आहे.

स्थायी समितीच्या रिक्त झालेल्या आठ जागांवर नुकतेच महासभेमध्ये नवीन सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले यांनी सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. महापौर रोहिणी शेंडगे यांनी सभागृहातच राजीनामा मंजूर करत रिक्त झालेल्या जागेवर आणखी एका सदस्याची नियुक्ती केली होती. त्यानंतर महापालिका प्रशासनाकडून सभापती निवडणुकीसाठी विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता.

विभागीय आयुक्त गमे यांनी 18 फेब्रुवारीला सभापतिपदासाठी निवडणूक जाहीर केली आहे. पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 18 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता स्थायी समितीच्या सभागृहात ही निवडणूक होणार आहे. त्यासाठी पीठासीन अधिकाऱ्यांकडून निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाणार असल्याचे मनपाकडून सांगण्यात आले.