शेवगावची दंगल पूर्वनियोजित असल्याचा संशय, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची शेवगावला भेट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दोन समाजांत धार्मिक तेढ निर्माण करून दंगली घडविण्यासाठी काही समाजविघातक शक्ती कार्यान्वित झाल्या आहेत. शेवगावची दंगल ही पूर्वनियोजित असल्याचा संशय असून, गेल्या चार-सहा महिन्यांत शहरात घडलेल्या विविध घटनांचा तपास करून दंगलीमागील मास्टर माइंड शोधून काढावा तसेच शहरातील अवैध धंदे कायमस्वरूपी बंद होतील व समाजकंटकांना मिळणारी आर्थिक रसद बंद होईल, अशा पद्धतीने ठोस कारवाई करावी, अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केले.

शेवगाव शहरात छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीवर झालेल्या दगडफेकीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आज शेवगाव येथे भेट दिली. यावेळी शासकीय अधिकाऱयांच्या बैठकीत ते बोलत होते.

यावेळी नगर जिह्याचे संपर्कप्रमुख आमदार सुनील शिंदे, सहसंपर्कप्रमुख रावसाहेब खेवरे, जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी, रामदास गोल्हार, एकनाथ कुसळकर, तालुकाप्रमुख अविनाश मगरे, माजी आमदार चंद्रशेखर घुले, माजी सभापती अरुण लांडे, संजय कोळगे, संजय फडके, अशोक शिंदे शीतल पुरणाळे, सुधीर बाबर, चंद्रकांत महाराज लबडे, व्यापारी प्रतिनिधी मनीष बाहेती, पुरुषोत्तम बिहानी, गोपाल धूत, मनोज कांबळे, अशोक गायकवाड, भारत लोहकरे, कॉ. सुभाष लांडे यांच्यासह प्रांताधिकारी प्रसाद मते, तहसीलदार छगन वाघ, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके, पोलीस निरीक्षक विलास पुजारी, सहायक गटविकास अधिकारी दीप्ती गाट, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सचिन राऊत उपस्थित होते.

विरोधी पक्षनेते दानवे यांनी शहरात दगडफेक झालेल्या परिसराची पाहणी केली. तसेच दुकानदार तसेच मारवाड गल्ली, जैन गल्लीतील नागरिकांची भेट घेऊन घटनेची माहिती घेतली. त्यानंतर व्यापारी, नागरिकांच्या बैठकीत त्यांनी संवाद साधला. तसेच पंचायत समिती कार्यालयात अधिकाऱयांची बैठक घेऊन दानवे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

यावेळी उपस्थित नागरिकांनी शहर परिसरात बोकाळलेल्या वाळूमाफिया यासह विविध अवैध धंद्यांच्या सुळसुळाटाबाबत तक्रारी केल्या. शहरातील शिवाजी चौकात कायमस्वरूपी पोलीस चौकी उभारण्याची तसेच विविध चौकांत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी केली. पोलीस निरीक्षक पुजारी यांनी याबाबत दाखल करण्यात आलेल्या विविध गुह्यांची माहिती देऊन आत्तापर्यंत 44 संशयितांना ताब्यात घेतले असून, फरारी आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती दिली.

यावेळी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे गुन्हेगारांना शोधून काढून गावात शांतता प्रस्थापित होईल, अशी ठोस कारवाई झालीच पाहिजे तसेच निरपराध नागरिकांवर विनाकारण कारवाईचा बडगा उगारण्यात येऊ नये, अशा सूचना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पोलिसांना दिल्या.