नगरमध्ये मिंधे-जगताप समर्थक मंडळांमध्ये जुंपली; माजी नगरसेवकावर जीवघेण्या हल्ल्याचा प्रयत्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगरमध्ये मिंधे आणि अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप समर्थक मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये बुधवारी रात्री मोठा राडा झाला. अश्लील गाणे वाजवण्यावरून दोन मंडळांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. या प्रकरणी 30 ते 40 जणांविरुद्ध शहरातील तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांनी दिली.

गणपती विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने शहरात मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. मात्र बुधवारी रात्री साडेअकराच्या सुमारास मंगलगेट परिसरातील दाणे डाबरा येथे मिंधे-आमदार संग्राम जगताप समर्थक मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये अश्लील गाणी वाजवण्यावरून हाणामारी झाली. यावेळी कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या मंडळासमोर लावण्यात आलेल्या नेत्यांचे बॅनरही फाडली.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक अनिल कातकडे, पोलीस निरीक्षक मधुकर साळवे आदींसह पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला होता. या प्रकरणी दोन्ही बाजुने एकमेकांविरुद्ध तोफखाना पोलीस स्थानकात फिर्याद दाखल करण्यात आली असून पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले आहे.

रंजित तरुण मंडळाचे अध्यक्ष आणि माजी नगरसेवक सचिन तुकाराम जाधव, प्रशांत ऊर्फ रॅन्बो काळे, वैभव काळे, सुरज काळे, सचिन राऊत, महेश बेद्रे, रोहीत पाथरकर व इतर 10 ते 12 जणांना ‘अश्लील गाणी का वाजवता? अशी विचारणा केल्याने मंडळातील सदस्यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच, शिवीगाळ व दमदाटी करत बॅनर पाडला, अशी फिर्याद मंगलगेट येथील वर्चस्व ग्रुपच्या गणेश मंडळाचे अध्यक्ष सागर राजू मुर्तोडकर यांनी दिली आहे.

तर सागर मुर्तोडकर, सनी ऊर्फ श्रीकांत मुर्तोडकर, प्रथमेश थोरात, भैया थोरात, विठ्ठल उप्पळकर, सुमित सुरसे, अमित सुरसे, ललीत चवालीया व इतर 10 ते 15 जणांना ‘आमच्या मंडळासमोर थांबू नका, तुमच्यामुळे पोलीस आम्हाला देखील मारतील’, असे म्हटल्याने सागर मुर्तोंडकर व त्याच्या मित्रांनी शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि मंडळासमोरील बॅनर फाडले, अशी फिर्याद रंजीत तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रशांत बापू काळे यांनी दिली आहे.