
गावठी कट्टे व काडतुसे विक्री करण्यासाठी नगरमध्ये आलेल्या बीड येथील तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चांदणी चौक परिसरात आरटीओ कार्यालयासमोर पकडले. त्याच्या ताब्यातून 3 गावठी कट्टे व 12 जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत. सुयोग ऊर्फ छोटय़ा मच्छिंद्र प्रधान (वय 23, रा. माळी वेस, बीड) असे आरोपीचे नाव आहे.
चांदणी चौक परिसरातील आरटीओ कार्यालयासमोर एकजण गावठी कट्टे विकण्यासाठी येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती. त्यांच्या सूचनेनुसार पथकाने चांदणी चौक परिसरातील आरटीओ कार्यालयासमोर सापळा रचला. काही वेळाने तेथे आलेल्या सुयोग प्रधान याच्या हालचाली संशयास्पद आढळल्याने पथकाने झडप घालून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडील सॅकमध्ये तीन गावठी कट्टे आणि पॅन्टच्या खिशात 12 जिवंत काडतुसे आढळून आली. त्याला ताब्यात घेऊन मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, भिंगार कॅम्प पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





























































