
हवाई सेवेसाठी प्रसिद्ध असलेल्या एमिरेट्स एयरलाइनमधील एका माजी हवाई सुंदरीने केलेल्या दाव्याची सध्या सोशल मिडीयावर चर्चा आहे. एअरलाइन्समधील हवाई सुंदरींचे वजन आणि दिसणे खूप महत्त्वाचे आहे. नेहमी हसतमुख चेहरा आणि लाघवी बोलणे असण्यासाठी हवाई सुंदरी प्रयत्न करतात. तसेच हवाई सुंदरींचे वजन वाढले आहे काय, यावर देखरेख ठेवण्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येते. तसेच वजन वाढले असल्यास हवाई सुंदरींना दंडही करण्यात येतो. तर वजन वाढल्याचे कारण देत पगारकपातही करण्यात येत असल्याचा दावा एका माजी हवाई सुंदरीने केला आहे.
एमिरेट्स एअरलाईनमधील हवाई सुंदरींचा हसतमुख चेहरा, त्यांची वेशभूषा आणि केशभूषा, त्यांचा आकर्षित करणारा गणवेश यामागे कंपनीने लागू केलेले कठोर नियम असल्याचे एका माजी महिला कर्मचाऱ्याने सांगितले. हवाई सुंदरी नेहमी हसतमुख राहव्यात, तसेच आकर्षक दिसाव्यात, यासाठी कंपनीने अनेक कठोर नियम लागू केल्याचे त्यांनी सांगितले. याबाबतचे वृत्त ‘आजतक’ ने दिले आहे.
दुबई ते न्यूझीलँड हा प्रवास 17 तासांचा आहे. या फ्लाईटमध्ये काम करण्याचा आमचा अनुभव कधीही सोशल मिडीयावर किंवा कोणासमोरही आलेला नाही. एमिरेट्स एअरलाईन्सच्या केबिन क्रूने नेहमी हसतमुख असावे, त्यांनी आपला “ग्लॅमरस एमिरेट्स फेस” कायम ठेवावा, यासाठी कंपनीने “अपीयरेंस मॅनेजमेंट प्रोग्रॅम” ही बनवला होता, अशी माहिती माजी कर्मचारी माया दुकारीक यांनी दिली. या प्रोग्रॅमवर हवाई सुंदरीची इमेज, रंग, रुप आणि दिसणे यावर देखरेख ठेवण्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती, असे त्यांनी सांगितले.
एमिरेट्स एअरलाइन्समध्ये गणवेशाबाबतचे नियम कठोर होते. गणवेश घातल्यानंतर शरीरावर गोंदलेला टॅटू दिसत असेल, अशा व्यक्तींना नोकरीच देण्यात येत नसल्याचे माजी कर्मचारी कारला बेजन यांनी सांगितले. तसेच हवाई सुंदरीच्या वजनाबाबतही एअरलाइन्सचे कठोर नियम होते. वजन वाढले आहे, असे वाटणाऱ्या हवाई सुंदरींवर अधिकारी नजर ठेवत होते.
वजन कमी करण्याबाबत सचूना देण्यापासून दंडही करण्याची कारवाईही करण्यात येत होती. तसेच अनेकदा वजन वाढल्याचे कारण देत पगारकपातही करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. अधिकाऱ्यांच्या कठोर वागणुकीमुळे त्यांना ‘वेट पोलीस’ (वजनावर लक्ष ठेवणारे अधिकारी)असेही काहीजण म्हणत होते. अधिकाऱ्यांनी दिलेल्या मुदतीत वजन कमी केले नाही तर नोकरीवर टांगती तलवार असायची, असेही त्यांनी सांगितले.
याबाबत एमिरेट्सच्या अधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. आमच्या कंपनीतील अंतर्गत धोरणांबाबत तसेच प्रक्रियांबाबत काहीही प्रतिक्रिया देणार नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच एखाद्या माजी कर्मचाऱ्याने केलेले आरोप, दावे यावरही प्रतिक्रिया देण्याची गरज नाही. कंपनीकडून कोणत्याही माजी कर्मचाऱ्यांची माहिती किंवा त्याच्यावरील कारवाई याबाबत माहिती देता येत नसल्याचे त्यांनी सांगितले.
वजन वाढलेल्या हवाई सुंदरींना व्यायाम आणि डाईट प्लॅन देण्यात येत होता. त्यानंतरही सुधारणा नसल्यास त्यांना सूचना करण्यात येत होत्या. त्यांची वजनाची नियमित तपासणी करण्यात येत होती. काही जणांवर कारवाई करण्यात येत असल्याचे एका माजी अधिकाऱ्याने सांगितले. काहीजणांना समज देणे, तर काहीजणांमध्ये सुधारणा न झाल्यास पगारकपातीची कारवाईही करण्यात येत असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे हवाई सेवेसाठी प्रसिद्ध असणारी एमिरेट्स एअरलाइन्स माजी कर्मचाऱ्यांच्या दाव्यांमुळे चर्चेत आली आहे.




























































