एअर इंडियाच्या विमानात आरोळ्या, किंकाळ्या आणि आक्रोश; कुणाचा खांदा निखळला तर, कुणाचा कान फुटला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

थायलंड येथून दिल्लीला निघालेल्या एअर इंडियाच्या विमानाचा प्रवास अक्षरशः जिवाचा थरकाप उडवणारा ठरला. विमान हजारो फूट उंच आकाशात असतानाच अचानक एअर टर्ब्युलन्सचे झटके बसू लागले. एअर टर्ब्युलन्स एवढा भीषण होता की विमानाने अचानक हवेतच गटांगळी खाल्ली आणि ते काही सेपंदांत 300 फूट खाली आले. या हादऱ्यांनी विमानात आरोळ्या, किंकाळ्या आणि आक्रोश झाला. 15 प्रवाशी जखमी झाले.

काही प्रवाशांच्या मानेला तर काहींच्या खांद्याला गंभीर दुखापत झाली. एका प्रवाशाचा तर कानाचा पडदा फाटला. वैमानिकाने कुशलतेने विमान सुखरूप दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरवले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

फुकेट येथून दिल्लीला येण्यासाठी एअर इंडियाचे एअरबस ए320 हे विमान सकाळी 8.27 वाजता आकाशात झेपावले. काही वेळात बहुतांश प्रवासी झोपले. सुमारे दीड तासांनी जवळपास 30 हजार फूट उंचीवर असताना विमानाला मोठे झटके बसू लागले. अचानक विमानाने गटांगळी खाल्ली आणि ते 300 फूट खाली आले. सुमारे 2 ते 3 मिनिटे विमान गटांगळी खात होते. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली. काही प्रवाशांच्या मानेला दुखापत झाली. एका प्रवाशाचे डोके जोरात आदळले. अनेक प्रवाशांच्या हाताला आणि पायांना दुखापत झाली. प्रचंड वेगाने विमान खाली आल्यामुळे एका प्रवाशाच्या कानाचा पडदा फाटला. मात्र, वैमानिकाने विमानावर नियंत्रण मिळवले आणि सुमारे सकाळी 11.30 वाजताच्या सुमारास विमान दिल्लीच्या विमानतळावर उरविले.

विमानाच्या आतील भागाला तडे

काही प्रवाशांनी विमानाच्या आतील भागाची छायाचित्रे सोशल मीडियावर पोस्ट केली आहेत. विमानाच्या छताला काही ठिकाणी तडे गेले. काही आसनांच्या वरच्या भागातील एसी व्हेंटदेखील तुटले. या संपूर्ण घटनेची डीजीसीएकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे.

सीट बेल्ट न बांधलेल्या प्रवाशांना झटका

काही प्रवाशांनी सांगितले की, विमानाने अचानक गटांगळी खाल्ल्यामुळे सीटबेल्ट न लावलेले प्रवासी आसनांवरून उडालेच. या प्रवाशांनाच जास्त दुखापत झाली आहे. विमानातील सर्व प्रवाशांची विमानतळावर वैद्यकीय तपासणी करण्यात आली. गंभीर जखमी असलेल्या प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विमानात एकूण 134 प्रवासी आणि 8 चालकदलाचे सदस्य होते. त्यापैकी 11 प्रवासी आणि 4 कर्मचारी मिळून 15 जण जखमी झाले आहेत.