
सामना प्रतिनिधी, मुंबई
विमानतळ प्राधिकरणाच्या मनमानी कारभारामुळे बामणवाडा हिल चकाला येथील रहिवाशांची कोंडी झाली आहे. विमानतळ प्राधिकरणाच्या कॉलनीतून पुढे पश्चिम द्रुतगती महामार्गाच्या दिशेने जाणारा रस्ता प्राधिकरणाने कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक बंद केला आहे. वर्षानुवर्षे सुरू असलेला हा रस्ता अचानक बंद झाल्याने येथील रहिवाशांना हायवेपर्यंत जाण्यासाठी चिंचोळय़ा गल्लीबोळातून जावे लागत आहे.
विलेपार्ले पूर्व येथील बामणवाडा हिल चकाला येथे जाण्यासाठी नागरिक वर्षानुवर्षे विमानतळ प्राधिकरणाच्या रस्त्याचा वापर करत आहेत. हा नेहमीचा रस्ता विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱयांनी बंद केल्याने रहिवाशांची मोठी गैरसोय होत आहे. हा रस्ता प्रधिकरणाने तत्काळ खुला करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
सोमवारी रहिवाशांचा मोर्चा
विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱयांनी मनमानी करत कॉलनीतून जाणारा रस्ता बंद केल्याने रहिवाशांची गैरसोय होत असल्याच्या निषेधार्थ शिवसेना विभागप्रमुख-आमदार अॅड. अनिल परब यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागप्रमुख सुभाष कांता सावंत यांच्या नेतृत्वाखाली सोमवार, 3 डिसेंबर रोजी मोर्चा काढण्याचा इशारा रहिवाशांनी दिला आहे. या मोर्चाला स्थानिक नगरसेविका विनी डिसोझा, शाखाप्रमुख नरेश कांता सावंत, उपशाखाप्रमुख सुनील आडेलकर, बाळा सरोदे उपस्थित राहणार आहेत.



























































