
सामना प्रतिनिधी । जयसिंगपूर
एकरकमी ऊस दर देण्यास कारखानदारांना बेमुदत वेळ दिल्याने शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होणार आहे. याशिवाय ऊस दराऐवजी शेतकऱ्यांना साखर देण्याची हास्यास्पद मागणी करून खासदार राजू शेट्टींनी आपला या बाबतीतील अभ्यास कमी असल्याचे सिद्ध केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना एफआरपीच्या 80 टक्के रक्कम आता द्यावी व 20 टक्के सवडीने द्यावी, अशी मागणी शरद जोशीप्रणित शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते अजित नरदे यांनी पत्रकार बैठकीत केली. या प्रस्तावाला 99 टक्के शेतकरी मान्यता देतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
अजित नरदे म्हणाले, खासदार शेट्टी यांनी केवळ लोकसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेऊन शेतकरी आंदोलनाचा खेळखंडोबा केला. त्यामुळे गळित हंगाम सुरू होण्यास वीस दिवस उशीर झाला. मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला शिरोळ तालुका वगळता अन्यत्र शेतकऱ्यांचा प्रतिसाद नसल्याने खासदार शेट्टींना आंदोलन गुंडाळावे लागले. आंदोलन मागे घेण्यासाठी स्वाभिमानी व कारखानदार यांच्यात झालेली तडजोड शेतकऱ्यांसाठी नुकसानकारक आहे. शेतकरी आज आर्थिक अडचणीत असल्याने ऊसबिलाची 80 टक्के रक्कम कारखानदारांनी ताबडतोब द्यावी व उर्वरित सवडीने द्यावी, अशी मागणी अजित नरदे यांनी केली. ऊसबिलाऐवजी साखर देण्याचा खासदार शेट्टी यांचा प्रस्ताव हास्यास्पद आहे. त्या साखरेची विक्री करण्यास अडीच लाख शेतकरी बाजारात आल्यास साखरेचे भाव 2500 रुपयांपर्यंत खाली येतील. यात कारखान्यांचे व शेतकऱ्यांचे नुकसान आहे. त्यामुळे या तडजोडीला शेतकरी संघटना विरोध करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.




























































